वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या कृषी महोत्सवाचा ना. वळसे-पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ

ना. उदय सामंत यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांची माहिती

चिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी कृषी, पशुसंवर्धन प्रदर्शन २०२४ महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवार दि. ५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता सहकार मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील व पालकमंत्री, उद्योग मंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून महोत्सवाचे अध्यक्षस्थान कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचे कुलगुरु डॉ. संजय भावे हे भूषविणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी चेअरमन प्रशांत यादव यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. खा. विनायक राऊत, रायगडचे खा. सुनील तटकरे, आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव, आ. योगेश कदम, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सुभाष बने, रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. तानाजी चोरगे, वरिष्ठ पत्रकार मधुकर भावे, जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, जिल्हा कृषी अधिक्षक सुनंदा कुराडे, पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. डी. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कृषि प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित उत्पादकांचे, कारखान्यांचे १०० स्टॉल्स सहभागी झाले आहेत.

यात गोमा डेअरी इंडस्ट्री, यशकिनारो, बारामती अॅग्रो, समृद्धी अॅग्रो, शिव ट्रेडर्स, गोदरेज, जय जवान जय किसान फर्टीलायझर, सानुगडे पाईप ठिबक सिंचन, कृषी मित्र, विजयश्री अॅग्रो, इशा व्हॅटनरी, गोदावरी पब्लिकेशन, अक्षर साहित्य याचबरोबर जिल्हा खरेदी विक्री संघ, शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय व दापोली कृषी विद्यापीठाची विविध प्रकल्प, अपरांत व माधव बागचे विभाग हे सर्व सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांची उत्पादने, खते, जैविक खते, बी बियाणे अशी कृषी, डेअरी व पशूसंबंधीत उत्पादने येथे असतील, आमच्या माहितीनुसार हा कोकणातील सर्वात मोठा कृषी महोत्सव होईल याची खात्री आहे असेही प्रशांत यादव यांनी सांगितले. पहिल्या दिवशी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल व नंतर सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या कार्यक्रमात स्टॉल बरोबरच कोकणात शेती व पशूपालनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काही तज्ज्ञ मार्गदर्शक बोलविले आहेत. या महोत्सवात दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ या वेळेत डॉ. डी. टी. भोसले यांचे प्राण्यांची उत्पादकता, खाद्य, प्रजनन आणि शेती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन होईल.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी संशोधन केंद्र आवाशीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानेश्वर जगताप यांचे कोकणातील फायदेशीर भात लागवड भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर सकाळी १०.४५ वाजता, उद्यान विद्या महाविद्यालय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रफुल्ल माळी यांचे सकाळी ११.३० वाजता कोकणातील मुद्यवर्गीय पिकाचे व हळद लागवड या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर दि. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत कोकणातील पशू व पशूपालन व्यवस्थापन या विषयावर पशूवैद्यकीय चिकित्सा विभाग, चिपळूणचे सहाय्यक आयुक्त डॉ. दत्तात्रय शंकर सोनावले यांचे सकाळी ११ ते १२ या वेळेत गोदरेज ऍग्रोव्हेटचे पशू आहार तज्ञ डॉ. रमेश पताळे पशूआहार व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

कल्पेश मधुकर सावंत हे संशोधन अधिकारी आहेत. ते सागरी जीवशास्त्र या विषयातील बधीस्त खेकडा पालन या नवीन विषयाबाबत मार्गदर्शन करतील. या बरोबरच शेतीला आवश्यक असलेल्या औजारांचे प्रदर्शन आहे. यात विविध विषयाची माहिती असेल. महिलांना चालना मिळावी यासाठी महिला बचत गटाला संधी दिली असून १०० महिला बचत गट सहभागी झाले आहेत. पशूधनाबाबत माहिती व्हावे यासाठी येथे गाय, रेडा, म्हैस याबरोबर इतर जनावरांचा समावेश आहे. पशूधनासाठी येथे स्पर्धा आहेत. या स्पर्धेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. दीड कोटीचा गजेंद्र रेडा व त्याचे पिल्लू तसेच अज्ञाधारक रेडा ही असणार आहे. या विविध घोडे, पक्षी, ससे, स्पर्धेतील बैल आहेत. डॉग शो आहे. तरी या कृषी महोत्सवातील कोकणातील शेतकऱ्यांना या शेती व पशुपालन विषयी प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांनी व्यक्त केला आहे.