दापोली | प्रतिनिधी:- दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची दोन घरटी आढळून आली आहेत. एकात ११६ तर दुसऱ्यात १२१ अंडी आहेत. दापोली तालुक्यात या हंगामात पहिल्यांदाच मुरुड समुद्रकिनाऱ्यावर एकाच महिन्यात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या अंड्यांची दोन घरटी तयार झाली आहेत.
या घरट्यातून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच कासवाची पिल्ले समुद्राकडे झेप घेतील, अशी माहिती येथील जीवरक्षक राजेश शिगवण यांनी दिली.
दापोली तालुक्यातील मुरुड गावचा समुद्रकिनारा हा स्वच्छ आणि सुंदर बीच म्हणून जगाच्या नकाशावर याची नोंद आहे. मुरुड गाव पर्यटनाप्रमाणे आता कासवांचे गाव म्हणून देखील हळूहळू प्रसिद्ध होत आहे.गेल्या वर्षी ७ जानेवारी २०२३ रोजी पहिलं घरटं आढळून आले होते, तर एप्रिल २०२३ मध्ये शेवटचं घरट संरक्षित केल होतं. गेल्यावर्षी अंदाजे २९८० अंडी संरक्षित केली होती आणि त्यातून अंदाजे १५५५ पिल्ले सोडली होती, अशी माहिती शिगवण यांनी दिली.