धाऊलवल्ली येथे तीन म्हशीवर विषप्रयोग?

 

आकस्मिक मृत्यूमुळे संशय बळावला

जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील धाउलवल्ली पोकळेवाडी येथील शेतकरी प्रभाकर पाडेकर यांच्या तीन दुभत्या म्हशी सागरी महामार्गावरील धाउलवल्ली सुकाडा फाट्यावर कातळावर मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच धाउलवल्ली येथे हा दुर्दैवी प्रकार घडल्याने शेतकऱ्यावर संकटच ओढवले आहे.

या प्रकरणी घातपाताचा संशय मालक पाडेकर यांनी वर्तविला असून अज्ञाताविरोधात नाटे पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

सागरी महामार्गावरील धाउलवल्ली सुकाडा फाट्यावर कातळावर म्हशी मृतावस्थेत झाल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सचिन पावसकर यांनी तात्काळ मालक पाडेकर यांना कळविले. पाडेकर आणि अन्य ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

म्हशी गतप्राण झाल्याचे आणि त्यांची अवस्था बघून आपल्या म्हशींना कोणीतरी जाणीवपूर्वक विषप्रयोग केल्याची भीती व्यक्त करत पाडेकर यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे येथे अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवली असल्याचे घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी म्हटले आहे.

नाटे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उत्तरीय तपासणी होणार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

हा विकृत आणि घातपाताचा प्रकार असून खरोखरच अशा प्रकारचे विकृत कृत्य झाले असल्यास योग्य तो तपास होऊन कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रभाकर पाडेकर यांच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या दुधाळ म्हशींच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरात हळूहळू व्यक्त होत असून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.