ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात २० कोटीची बिले जमा

गगनबावडा येथील डी. वाय. पाटील कारखान्याचे अध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील यांची माहिती

वैभववाडी | प्रतिनिधी :
गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील दुसऱ्या पंधरवड्याचे २० कोटी ४ लाख १६ हजारांचे ऊस बिल ऊसपुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. अशी माहिती अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली. कारखान्याने १६ ते ३० नोव्हेंबर या दुसऱ्या पंधरवड्यात गाळप ६२ हजार ६३० टन उसाचे ३२०० रु. प्रमाणे होणारे बिल आदा केले.

‘कारखान्याने चालू हंगामात २७ डिसेंबरअखेर २ लाख ४० हजार ५९० टन उसाचे गाळप करुन २ लाख ३३ हजार ५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. तसेच कारखान्याचा को-जनरेशन व डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून चालू हंगामात ५.५० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. गाळप उद्दिष्ट पूर्ततेसाठी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासदांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. यावेळी संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.