कणकवली शहरात चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न

कोयता घेवून संशयित फिरतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली

कणकवली : कणकवली शहरात थर्टी फर्स्ट च्या मध्यरात्री संधी साधत चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला .त्यामध्ये काही रोख रकमेसह मुद्देमाल चोरीस गेला असला तरी उशिरापर्यंत कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल नव्हती. दरम्यान, चोरट्याने दोन ठिकाणी कोयते चोरले असल्याचे समजत असून एका शासकीय रास्त दराचे धान्य दुकानातील १ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम लांबवली आहे.

चोरटा कोयता घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ कणकवली शहरात जोरदार व्हायरल होत आहे. या चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

कणकवली शहरात चोरट्याने कणकवली कंझ्युमर्स सोसायटी समोरील गीतांजली कामत यांचे रास्त दराचे धान्य दुकान रात्री २ वाजता चोरट्याने फोडल्याचे तेथील सीसीटीव्हीत कैद झाले आहे. तसेच जळकेवाडी येथील राजू चिंदरकर यांच्या घरातील एक कोयता, ३ कपाटातील साहित्य विस्कटून टाकले होते, आणि गाडीचे पाने चोरीला गेले आहेत. बांधकरवाडी येथील मीनल सावंत, मधलीवाडी किशोर राणे यांच्या जुन्या घरातील कोयता आणि काही साहित्य चोरीला गेले. या चार ठिकाणी अज्ञात चोरट्याने चोरीचा प्रयत्न केला आहे. त्या चोरट्याने कडी कोयंडा तोडत, कपाटे उचकटून चोरीचा प्रयत्न केला. या चोरीच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांनी एका चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मात्र, याबाबत चोरी झालेल्या घरमालकांची कोणतीही तक्रार दिलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.