संजयच जाणं जिव्हारी…!

संतोष वायंगणकर

देवगडमध्ये ३० आणि ३१ डिसेंबर असे वर्षअखेरचे दोन दिवस देवगडच्या समुद्र किनाऱ्यावर जल्लोष हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम गेली सात-आठ वर्षे साजरा केला जातो. या जल्लोष कार्यक्रमाची शान ज्याच्या निवेदनाने दरवर्षी वाढत राहिली तो देवगडच्या संजय भालचंद्र धुरी याचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले.

जल्लोषच्या आठवणी आणि त्याच्या निवेदनाचे शब्द कानात रूंजी घालत असतानाच अचानकपणे संजय धुरीच्या निधनाची न्यूज डेस्कवर यावी ,सारच अनाकलनिय धक्कादायक असच होतं. खात्री करण्यासाठी प्रहार डिजिटलचे समन्वयक हेमंत कुलकर्णी याच्याकडे खात्री केली तर एचडीएफसी बँकेसमोर संजय कोसळल्याची माहिती त्याने दिली. अस्वस्थ व्हायला झालं. २०२३ ला निरोप देताना भांडुपचे किशोर गावडे, ३१ डिसेंबर रात्रौ माझा कॉलेजमधील सिनियर मित्र आणि नातेवाईक विवेक केळुसकर असाच अचानक कोसळला. या अशा धक्क्यानी खरच मन फारच हळव झालेलं असताना देवगडातील मित्र संजय धुरीच्या जाण्याने फार मोठा धक्का बसला. कधीतरी सर्वांनाच जायच आहे हे खरं आहे.

परंतु केव्हाही जायच यावर काय बोलायच हा प्रश्नच आहे. अर्थात काळ-वेळेची ज्याची मालकी आहे. त्यांने सारं वेळापत्रक बनवलेलं आहेच. माझ्या पत्रकारीतेतील सुरूवातीचा काळ हा देवगडात गेला. तब्बल आठवर्षे मी देवगडला होतो. या देवगडच्या पत्रकारीतेत अनेक राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात प्रामाणिकतेने धडपडणारे अनेक मित्र भेटले. त्यातले अनेकजण आजही अगदी कालपरवा भेटावेत किंवा रोजच दिसावेत-भेटावेत असं वाटत रहात. देवगडमध्ये स्वरगंध आणि विविधा या दोन सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आणि देवगडातील सांस्कृतिक चळवळ सतत पुढे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्था या संस्थेत काम करणारे, सतत धडपडणारे प्रमोद नलावडे, प्रकाश गोगटे, संजय धुरी, कै.नंदू देसाई असे सारेच जीवाभावाचे मित्र मला भेटले. विविधाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय धुरी करायचा. देवगडच्या सांस्कृतिक चळवळीतल आणखी एक नाव म्हणजे प्रमोद नलावडे १९९८७-८८ साली देवगडमध्ये मालवणी संमेलन भरलेल त्याच मालवणीतून उत्तम निवेदन प्रमोद नलावडे यांनी केलेलं. अशाच अनेक आठवणी संजय धुरीसंबंधी सांगता येणाऱ्या आहेत. आपला वडिलोपार्जित बेकरी व्यवसाय सांभाळत आपली सांस्कृतिक क्षेत्रातली आवड जपणारा संजय निवेदनाद्वारे देवगडवासियांच्या मनात घर करून राहिला. ३१ डिसेंबरच्या सरत्या वर्षातील निवेदनाने जल्लोष कार्यक्रमातून आपल्या खुमासदार शैलीतील निवेदनाने उपस्थितांचा उत्साह वाढविणारा संजय नेहमीच सर्वांच्या स्मरणात राहिल यात शंका नाही. त्याला वाचनाची आणि लिखानाचीही आवड होती. तो सहज सुंदर लिहायचा. त्यांने लिहिलेली फेसबुकवरील पोस्ट ही नव काहीतरी देऊन जायची. देवगडला पर्यटन वाढाव तिथले व्यवसाय वाढावेत रोजगारी नव-नवीन संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्याच्या व्यापारी सहकारी मित्रांसोबत सतत प्रयत्न करायचा. संजयमध्ये सकारात्मकता होती. त्यामुळे चांगल काही घडावं, व्हाव यासाठी त्याचा प्रयत्न होता. सदा हसतमुख चेहरा असणारा संजय कधी कोणाशी वाद घालताना, भांडताना कोणाला दिसला नाही. ज्या प्रामाणिकतेने तो व्यवसाय करायचा तिच प्रामाणिकता त्यांने सामाजिक कार्यातही जपली होती. देवगडला गेल्यावर हमखास ज्याला भेटावं, गप्पा कराव्यात असं वाटणाऱ्या मित्रांपैकी संजय एक होता. जल्लोष कार्यक्रमात निवेदनातील व्हिडिओ कालच पाहिलेला. त्याची स्टेजवरची धावपळ आणि खूप छान आवाजातल त्याच निवेदन त्यातील आपलेपणा, जिव्हाळा आणि जल्लोषच्या माध्यमातून देवगडला पर्यटन व्यवसायात अधिक वाढ होण्यासाठीचे त्याचे प्रझेंटेशन हे सारच नेहमीच आठवत राहिलं. सरत्या वर्षाच्या जल्लोषच्या माध्यमातून निरोप घेऊन नववर्षाच्या शुभारंभदिनी दिवस मावळतीकडे जात असताना संजयने देवगडमधून घेतलेली ‘एक्झीट’ मनस्वी दु:खी करणारी आहे. संजयला भावपूर्ण श्रद्धांजली !