खेड (प्रतिनिधी)खेड नगरपरिषद हद्दीत जलवाहिन्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहेत. या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी खोदाईचे सत्र सुरूच आहे. खोदाई केल्यानंतर मातीचा भराव पूर्णपणे बुजवून मार्ग सुस्थितीत करण्याची तसदी नगरप्रशासनाकडून घेतली जात नसल्याने अपघातांचा धोका कायम आहे. याशिवाय पादचाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांसह नळजोडण्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण थांबेनासेच झाले आहे. बरीच जलवाहिन्यांची दुरूस्तीच करण्यात आलेली नाही. याचमुळे जलवाहिन्यांमध्ये बिघाड होत असून पाणीपुरवठ्यातही व्यत्यय येत आहे.
याशिवाय कमी दाबाच्या पाण्याची समस्या देखील त्या त्या भागातील रहिवाशांना सतावत आहे. जलवाहिन्यांसह नळ जोडण्यांमध्ये निर्माण झालेला बिघाड दूर करण्यासाठी पाणी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून खोदाई केली जात आहे.
या खोदाईनंतर जलवाहिनीसह नळजोडण्यातील बिघाड दूर झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी खोदाई केलेला भाग पूर्णपणे न बुजवता मातीचा भराव वरचेवर ठेवला जात असल्याने धुळीचे साम्राज्य पसरून काही वेळा दलदलदेखील निर्माण होत आहे.यामुळे मार्गावरून धावणाऱ्या वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांचा जीव टांगणीवरच रहात आहे