पाटपन्हाळे विद्यालयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम संपन्न

Google search engine
Google search engine

मार्गदर्शन , प्रतिज्ञा व जनजागृती फेरी सादर

पाटपन्हाळे | वार्ताहर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानअंतर्गत ” मार्गदर्शन कार्यक्रम , प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी उपक्रम नुकतेच संपन्न झाले.कुष्ठरोगाच्या निर्मूलनाबाबत व समाजात जागृती होण्यासाठी “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान ” हे ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या पंधरवड्याच्या कालावधीमध्ये राबवायचे आहे.सदर नियोजनानुसार “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ” गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयात कुष्ठरोग निर्मूलनाबाबत व जनजागृतीबाबत मुख्याध्यापक श्री.एम.ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे आरोग्य सेवक श्री.पुप्पलवार पी.एस.यांनी विद्यार्थ्यांना कुष्ठरोग म्हणजे काय ?, रोगाची लक्षणे , रोगावर केले जाणारे उपाय , आरोग्य विभागामार्फत होणारी जनजागृती , कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम व उपक्रम , कुष्ठरोगाविषयी समज – गैरसमज , रोग निर्मूलनासाठी करावयाचे सहकार्य व प्रयत्न आदीमुद्यांनुसार मार्गदर्शन केले.

श्री.पुप्पलवार यांनी कुष्ठरोग निर्मूलनाबाबत माहिती तक्ता व चित्रे या साहित्यांचा मार्गदर्शनात वापर करुन विद्यार्थ्यांना ओघवत्या भाषेत पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक एम ए थरकार यांनी कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबवले जाणारे कार्यक्रम व उपक्रम , आरोग्य विभागामार्फत केले जाणारे प्रयत्न , कुष्ठरोग होण्याची कारणे , लक्षणे व त्यावर केले जाणारे उपाय यांबाबत मार्गदर्शन केले. सदरच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विषय शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एम.आंबेकर यांनी केले.तसेच “स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ” न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिज्ञा सादर केली. पाटपन्हाळे हायस्कूल परिसर व शृंगारतळी बाजारपेठ या भागात ” कुष्ठरोग जनजागृती व निर्मूलन “याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी सादर केली. ” तपासून घ्या तीन गोष्टी , कुष्ठरोगापासून मिळेल मुक्ती ” , ” चला मिळून सारे प्रतिज्ञा करूया , कुष्ठरोग दूर करूया ” , ” दिसेल चट्टा , त्वरित डॉक्टरांना भेटा ” , अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. जनजागृती फेरी या उपक्रमासाठी मुख्याध्यापक एम.ए.थरकार , प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे आरोग्य सेवक श्री. पुप्पलवार पी.एस. ,आरोग्य सेविका सौ.घावट , सौ.लाकडे , सांस्कृतिक विभाग प्रमुख व शिक्षिका सौ.एस.एस.चव्हाण , श्री.मेटकरी एस.बी. , श्री.घाणेकर एस.एस. , श्री.पवार व्ही.व्ही. , सौ.एस.एस.चव्हाण , श्री.एस.एम.आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदरच्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानासंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम , प्रतिज्ञा सादरीकरण व जनजागृती फेरी या उपक्रमांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकला वाडकर यांचे सहकार्य लाभले. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत राबवलेल्या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालयाला सहकार्य लाभल्याबद्दल विद्यालयातर्फे सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी आभार मानून उपक्रमांचा समारोप केला.