गुहागर तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी डॉ.अनिल जोशी तर व्हा.चेअरमन पदी रवींद्र अवेरे बिनविरोध

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनलने महाविकास आघाडी पॅनलचा धुव्वा उडवत 12 – 3 ने विजय मिळविला होता. आज निवडणुक निर्णय अधिकारी कुमार देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकारी निवडीमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मा. डॉ.अनिल जोशी (नरवण) यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमनपदी आंबेरे खुर्दचे सरपंच रवींद्र अवेरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. नारायण गुरव,संचालक सुरेशदादा सावंत, श्रीकांत महाजन,लक्ष्मण शिगवण, सुभाष कोळवणकर, सुरेश चौगुले, सिराज घारे,शाम गडदे, गणेश तांबे,सौ.रश्मी घाणेकर,सौ.अश्विनी जोशी,सचिन बाईत,पांडुरंग कापले,पंकज बिर्जे आदी सर्व नूतन संचालक यावेळी उपस्थीत होते.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सन्मा.डॉक्टर तानाजीराव चोरगे साहेब यांच्या प्रेरणेने या गुहागर तालुका खरेदी विक्री संघातील सहकार पॅनलला प्रारंभ झाला होता. या सहकार पॅनलला माजी आमदार डॉ.विनय नातू यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि यामुळेच हे सहकार पॅनल या संघाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊन आज त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली असल्याचे चेअरमन डॉ.अनिल जोशी यांनी सांगितले.गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित खतपुरवठा व त्यांच्या शेतमालाला योग्य न्याय मिळवून देऊन गुहागर मधील शेतकरी आर्थिक संपन्न होण्यासाठीचे प्रयत्न सर्व सहकाऱ्यांना बरोबळ घेऊन करणार असल्याचे सांगितले. या गुहागर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील ज्येष्ठ राजकारणी विश्वनाथ दादा अडुरकर यांचा बाद झालेला अर्ज विशेष चर्चेचा ठरला होता. तर गुहागर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष जयदेव मोरे,पिढ्यानपिढ्या सहकार क्षेत्रात काम करणारे पद्माकर आरेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत,वैभव आदवडे,प्रमोद शिर्के,रविंद्र आग्रे यांचा महाविकास आघाडी पॅनल मधून झालेले पराभव लक्षवेधी ठरले होते. डॉ.अनिल जोशी आणि रवींद्र अवेरे यांच्या निवडीचे गुहागर तालुक्यातून अभिनंदन होत असून त्यांच्याकडून खरेदी विक्री संघ आर्थिक सक्षम आणि शेतकरी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तालुका अपेक्षा ठेवून आहे.