वेळास समुद्रकिनारी धूपप्रतिबंधक बंधारयाची गरज – शहाजान हारविटर

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने प्रस्थावित केलेल्या येथील कामांना मंजुरी देण्याची मागणी

मंडणगड : प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील कासवांचे गाव म्हणून देश – विदेश स्तरावर प्रसिद्ध असलेले वेळास गावत समुद्र किनाऱ्यालगत असल्यालेल्या बाणकोट ते वेळास दरम्यानच्या रस्त्याची समुद्राच्या उधाणाच्या अजस्त्र लाटांनी वारंवार दुरवस्था होत असते. शिवाय लाटांमुळे मोठ्या प्रमाणात येणारा कचरा, रस्त्यालगत असलेली नळपाणी योजनेची उखडली जाणारी पाईप लाईन आणि वारंवार नुतनीकरण अथवा दुरुस्ती होऊन देखील रस्त्याची होणारी धूप अशा विविध समस्या या मार्गावर भेडसावत आहेत. त्यामुळे या मार्गावरील पाण बुरुज ते दर्गा पर्यंतच्या किमान सुमारे एक ते दीड की. मी. अंतरात धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या निर्मिती करण्याची मागणी बाणकोट येथील सामाजिक कार्यकर्ते शहाजान हारविटर यांनी माद्यामांशी बोलताना व्यक्त केली.
दैनिक प्रहार जवळ बोलताना हारविटकर म्हणाले कि, वेळास, बाणकोट येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी प्रलंबित आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग, मंडणगडच्या वतीने धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी शासनदरबारी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्या कामास मंजुरी मिळाली नाही, धूपप्रतिबंधक बंधाऱ्याअभावी पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे रस्ता नादुरुस्त होणे, रस्त्यालगत असलेल्या पाणी योजनेच्या पाईप उखडणे आदि समस्यांना वेळास व नजीक असलेल्या बाणकोट गावांना भेडसावतात. सुमुद्राच्या अजस्त्र लाटांनी या मार्गाची दुरवस्था होते तर किनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत असते, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा पावसाळ्यात वेळास गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. येथील स्थानिक नागरिक प्रशासनाच्या येथील समस्सेबाबत कोणतीही कार्यवाही करत नसल्याने नाराज आहेत, आगामी काळात त्याचे रुपांतर आंदोलनात होऊ शकते. या बाबी शासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे, येथील नागरिकांची ही समस्या आग्रहाने सोडवण्यासाठी गरज आहे.
ते पुढे म्हणाले कि, वेळास गाव, येथे येणाऱ्या ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ समुद्री कासवांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे देश विदेशातील पर्यटक वेळासला भेट देतात. शिवाय या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे, वेळासतून सावित्री नदीच्या पलीकडील बाजूस असलेले प्रसिद्ध हरे हरेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि तीर्थक्षेत्रासाठी आलेल्या भाविकांसाठी वेळासच्या नजिक सुमारे २५ कि.मी.अंतरावर असलेले मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली पर्यटन क्षेत्र आहे. या दोहोंच्या मार्गात मध्यभागी असलेले वेळास हे येथे उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बलस्थांनामुळे पर्यटनदृष्ट्या केंद्रबिंदू ठरू शकते. या सर्व बाबींचा व समस्यांचा विचार करून सरकारने वेळास येथे धूपप्रतिबंधक बंधारा किमान या पावसाळ्याआधी मंजूर करून त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.