कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयात आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर आपल्या दैनंदिन कामकाजात करत डिजिटल पतसंस्था म्हणून ग्राहकाभिमूख सेवेच्या माध्यमातून अल्पावधीत नावलौकिक प्राप्त झालेली सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या पतसंस्थेच्या सहकार क्षेत्रातील कामाची दखल घेवून अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे या सहकार क्षेत्रासाठी देशपातळीवर काम करणा-या संस्थेने सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज पतसंस्था मर्यादीत फोंडाघाट या पतसंस्थेला मानाचा समजला जाणारा बँको पतसंस्था ब्लू रिबन २०२२’ हा पुरस्कार जाहीर केला आहे. हि संस्था सहकार क्षेत्राला बळकटी देणा-या पतसंस्थाच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने सहकार परीषद आयोजित करून उत्कृष्ट कामकाज केलेल्या पतसंस्थांना पुरस्काराने सन्मानित करते तसेच सहकारातील कायदे कानून, त्यामध्ये होणारे बदल, नवनवीन तंत्रज्ञान याबाबतची माहीती संकलन करते त्याच बरोबर ही माहीती संस्था पर्यंत पोहचविण्याकरिता सेमिनार आयोजित करून तज्ञाच्या वतीने मार्गदर्शन करत असते.
संस्थेस मा. सहकार आयुक्त व निबंधकसो, पुणे यांनी नवीन पाच शाखा तसेच सिंधुदुर्ग जिल्हाबरोबरच संपूर्ण रत्नागिरी जिल्हा व संपूर्ण कोल्हापूर जिल्हा असे तीन जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर केले आहे. नवीन मंजूर झालेल्या दोडामार्ग, बांदा, वेंगुर्ला, कट्टा व खारेपाटण या पाच शाखा या मार्च महीन्यापर्यंत सुरू होत आहेत. पतसंस्थेने आपल्या कामकाजात अमुलाग्र बदल केला असून पतसंस्थेचे कामकाज हे कोअर बँकिंग सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालत आहे. पतसंस्थेने एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एसएमएस अर्लट, क्युआर तसेच पासबुक: प्रिंटींग सारख्या सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मोबाईल अॅप व्दारे विविध सेवा संस्थेने चालू केल्या आहेत. याचबरोबर संस्था सामाजिक कार्यातही मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवीत आलेली आहे. संस्थेस मिळालेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून संस्थेचे अभिनंदन होत आहे. संस्थेस मिळालेला हा पुरस्कार म्हणजे संस्थेच्या सर्व सभासद, हितचिंतक तसेच असंख्य ग्राहकांच्या विश्वासाचे व संस्थेच्या सर्व संचालक तसेच कर्मचारी यांच्या परिश्रमाचे फळ असल्याचे संस्थेचे श्री. दिलीप स. पारकर व मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. ईश्वस्वास शा. पावसकर यांनी सांगितले व संस्थेवर असाच विश्वास ठेवून संस्थेच्या विविध ठेव योजनांमध्ये तसेच भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याज दरांचा लाभ घ्यावा असे आव्हान करून असंख्य ग्राहकांचे आभार मानले.