महिलांनी रिकामी हांडे आणून केला निषेध | आयनल मणेरवाडी, रोहिलेवाडी येथील पाणी पुरवठा २२ जानेवारीपासून बंद

 

कणकवली : तालुक्यातील आयनल गावातील मणेरवाडी, रोहिलेवाडी येथील पाणी पुरवठा २२ जानेवारीपासून बंद झाला आहे. त्‍यामुळे आक्रमक झालेल्‍या काही महिलांनी रिकामे हंडे आणून निषेध केला. या प्रश्‍नावर ग्रामसभेत चर्चा झाली. त्‍यांनतर पुढील पाच दिवसांत या दोन्ही वाड्यांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्‍वाही सरपंच सिद्धी दहिबांवकर यांनी दिली.

आयनल ग्रामपंचायत येथे सरपंच सिध्दी दहिबांवकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. या सभेला उपसरपंच विलास हडकर, चेअरमन चिंदरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भालचंद्र साटम, माजी सरपंच बापू फाटक, भाई साटम, उत्तम ओटवकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

ग्रामसभेत नूतन सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला तसेच विविध विकास कामांवर चर्चा झाली. यादरम्यान दोन वाड्यांना २२ जानेवारी पासून पाणी पुरवठा होत नसल्याबाबतचा मुद्दा महिल ग्रामस्थांनी मांडला. त्यावर सरपंच उपसरपंचांकडून समाधान कारक उत्तर न आल्‍याने महिला आक्रमक झाल्या. महिलांनी या कारभाराबाबत रिकामी पाण्याची भांडी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आणून निषेध केला. त्‍याबाबतची माहिती माजी सरपंच बापू फाटक यांनी देत ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांना नागरिकांना पाणी पुरवठा करता येत नसल्याचा आरोप केला.

पूर्वीच्या काळात माझ्या कारकिर्दीत पाणी बिलांवर आम्ही नळयोजना सक्षमपणे चालवली होती. त्या काळात संपूर्ण कामगार वेतन आणि लाईट बिल थकीत पूर्ण रक्कम आम्ही भरत होतो. आताच तुम्हाला ही नळयोजना परवडत नाही,असा सवाल माजी सरपंच बापू फाटक यांनी केला आहे. तसेच जर नळयोजनेबाबत अडचणी असल्या तर आम्ही मार्ग काढला असता, गावातील नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे. ही आमची भूमिका आहे. महिलांनी जे आंदोलन केले ते योग्यच आहे असेही श्री. फाटक म्हणाले.

दरम्‍यान पुर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळेच ग्रामपंचायतीवर ही वेळ आल्‍याची माहिती उपसरपंच विलास हडकर यांनी दिली. ते म्‍हणाले, आयनल ग्रामपंचायत नळयोजना एक पंप जळाल्यामुळे रोहिलेवाडी व मणेरवाडी पाणीपुरवठा खंडित आहे. जळालेल्या पंपाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २७ हजार एवढा खर्च अपेक्षित होता. मात्र संबधित नळपाणी योजनेच्या खात्यावर ८ हजार एवढीच शिल्ल्क आहे. या नळयोजना कामगाराचा पगार गेले ५ महिन्यांचा बाकी आहे. मणेरवाडी येणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ४० वर्षापूर्वीची सिमेंटची असून बऱ्याच ठिकाणी गळती आहे. नळपाणी योजनेचे लाईट बिल सरासरी १० हजार पर्यंत येते. आताची वीज बिलाची थकीत रक्कम ६८ हजार आहे. फक्त ८३ नळग्राहक असुन पाणीपट्टी मागील सरपंचांनी दरमहा १५० रुपये ठेवली असून त्याची जमा १२,४५० रुपये एवढी रक्कम होते. त्यातही पाणीपट्टी किमान १५ ते २० लोकांची प्रत्येकी २ हजार पेक्षा जास्त बाकी आहे. त्यामुळे योजना चालवण्याबाबत कोणताही ताळमेळ नाही . यापूर्वी पंप बिघडला तर अधिकचे पंप होते. ते २ पंप माजी सरपंचांनी लिलावात काढले. त्यामुळे तातडीने पाणी चालू करताना पंप दुरुस्तीसाठी आर्थिक अडचण ग्रामपंचायतीला आलेली आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत सुरळीत करण्यात येईल. मात्र विरोधकांनी आपल्या अपयशाचे पाप झाकण्यासाठी खोट्या प्रसिध्दसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप उपसरपंच विलास हडकर यांनी केला.