इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर
लोकसभा निवडणुकीला जेमतेम तीन-साडेतीन महिने बाकी आहेत आणि दुसरीकडे अयोध्येत भव्य राम मंदिर वेगाने उभारले जात असून, येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न होत आहे. राम मंदिराच्या वातावरणाने सारा देश भक्तिमय होत असताना भाजपाविरोधात स्थापन झालेल्या राजकीय पक्षांच्या इंडिया नामक आघाडीत रोज धूसफूस वाढत चालली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आहेत. मोदी-अमित शहांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्षे भारतीय जनता पार्टीची देशात चौफेर घोडदौड चालू आहे. देशातील १२ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री आहेत व १६ राज्यांत भाजपा सत्तेवर आहे. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा विजयाची हॅटट्रिक साध्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने जनमत कोणामागे आहे, याचा कौल दिला आहे. केवळ मोदींना पंतप्रधानपदावरून हटविण्यासाठी व लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी अठ्ठावीस विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया नामक आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या स्थापनेला साडेसात महिने होत आले, पण इंडियाचा नेता कोण?, इंडियाचा चेहरा कोण?, इंडियाचा निमंत्रक कोण?, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण? हे अजून या आघाडीला ठरविता आलेले नाही.
इंडिया स्थापन करताना मोठा गाजावाजा झाला, पण गेल्या साडेसात महिन्यांत काय साध्य झाले, ते सांगता येत नाही. राम मंदिराच्या मुद्द्यावरून इंडियामधील सारे विरोधी पक्ष भाजपाच्या जाळ्यात फसले आहेत. राममंदिराला थेट विरोध करता येत नाही व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आनंदाने सहभागीही होत नाहीत, अशी इंडियाची अवस्था आहे. इंडिया म्हणजे पराभूत अवस्थेतील राजकीय नेत्यांचा जमावडा आहे, असेच यापुढेही राहणार असेल, तर भाजपा लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ हे ध्येय सहज साध्य करून दाखवेल.
इंडियामध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला खरोखरच भाजपा विरोधकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आहे का?, अशी शंका येऊ लागली आहे. जागा वाटप असो की नेता निवड असो, काँग्रेसचा वेळकाढूपणा चालूच आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या आयोजनात काँग्रेसने सर्व ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसला सर्वाधिक जागा लढवायच्या आहेत व इंडियातील प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात आपला हेका सोडायला तयार नाहीत, हीच खरी गोम आहे. इंडियातील प्रादेशिक पक्ष हे एक नेता व त्यांची घराणेशाही याभोवती केंद्रित आहेत. त्यांना केवळ त्यांच्या राज्यात रस आहे. आपल्या राज्यातील महत्त्व व ताकद कमी होता कामा नये यासाठी ते ठाम असतात.
राहुल गांधी यांची ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून निघालेली पहिली भारत जोडो यात्रा ३० जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरपर्यंत गेली होती. तेव्हा काँग्रेसने युपीला महत्त्व दिले नव्हते. आता मात्र येत्या १४ जानेवारीपासून सुरू होणारी भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशातून ११ दिवस, २० जिल्ह्यांतून १०७४ कि.मी. प्रवास करणार आहे.
इंडियामध्ये सपा – बसपा एकत्र येतील का?, हा प्रश्न अजून सुटलेला नाही. सपाला किती जागा काँग्रेस सोडणार हे अजून ठरलेले नाही. भाजपाच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा करायचा, असे काँग्रेस सांगत असते, ते कोणत्या आधारावर? येत्या १४ जानेवारीला राहुल गांधी यांची दुसरी भारत जोडो न्याय यात्रा सकाळी सहा वाजता मणिपूरमधून सुरू होणार आहे. ६२०० किमी यात्रेचा २० मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. यूपीमध्ये वाराणसी, प्रयागराज, अमेठी, रायबरेली, लखनऊ, अलिगढ, आग्रा असा मार्ग आहे.
इंडियाची पहिली बैठक जून २०२३ मध्ये पाटणा येथे झाली. नंतर बंगळूरु, मुंबईत झाली. शेवटची बैठक दिल्लीत झाली. जसे मायावतींना इंडियात घ्यायचे की नाही हे अजून ठरलेले नाही तसेच महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला घ्यायचे की नाही याचाही अजून निर्णय झालेला नाही. काँग्रेसची तामिळनाडूत द्रमुक, बिहारमध्ये राजद व जनता दल युनायटेड, झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, तसेच आसाममध्ये स्थानिक पक्षांबरोबर निवडणूकपूर्व आघाडी आहे. केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब येथे इंडियात जागा वाटपाचा मोठा तिढा आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात विस्तव जात नाही. तेथे काँग्रेसचे नेते अधिर रंजन यांचा ममता बॅनर्जींना सक्त विरोध आहे. केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा आहेत, त्यात काँग्रेसचे १९ खासदार आहेत. मग काँग्रेस पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जागा सोडणार का?, हा कळीचा मुद्दा आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पक्ष व काँग्रेस यांच्यात संघर्ष टोकाला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान काँग्रेसला किंमत देत नाहीत. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सपासाठी आग्रही आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कमलनाथ यांच्या हट्टापोटी सपाला एकही जागा सोडली नव्हती, याचा राग अखिलेश यादव यांच्या मनात आहे. राहुल गांधींची यात्रा सुरू होण्यापूर्वी इंडियामध्ये जागा वाटप करावे, असा आग्रह अखिलेश यांनी धरला आहे. मुंबईत तर काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही दक्षिण मुंबई हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ असून काँग्रेस कधी लाटेत निवडून आलेली नव्हती, असे सांगून त्यांनी उबाठा सेनेच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
सन २०२४ लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप हेच इंडियापुढे सर्वात मोठे आव्हान आहे, पण काँग्रेसला अजून त्याची घाई दिसत नाही. जागा वाटप करताना भाजपाशी लढण्याची ताकद कोणत्या पक्षात कुठे आहे, हा सर्वात महत्त्वाचा निकष असणार आहे. सन २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी हा आधार उपयोगाचा नाही. तेव्हा युती व आघाड्या वेगळ्या होत्या. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करून मोठी प्रसिद्धी मिळविली. त्याचे व्हीडिओ चित्रण स्वत: राहुल गांधींनी केले. विरोधी पक्षांनी जाट समाजाचा अवमान केला म्हणून या घटनेचे भांडवल भाजपाने केले, हरयाणा व राजस्थानात काही ठिकाणी जाट रस्त्यावरही उतरले. विरोधकांचे भान कसे सुटते, त्याचे हे उदाहरण होते.
द्रमुकचे उदयनिधी मारन यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केले. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, डावे, काँग्रेस, द्रमुक हे हिंदूंच्या कसे विरोधात आहेत हे सांगायला भाजपाला निमित्त मिळाले. एका प्रकरणात राजदचे तेजस्वी यादव हेही द्रमुकच्या दयानिधी मारन यांच्यावर भडकले. यूपी, बिहारचे लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात, असे वक्तव्य दयानिधींनी केले होते. त्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्याने राजद व द्रमुक यांच्यात तणातणी झालीच.
काँग्रेसने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीनही हिंदी भाषिक राज्यांत मित्रपक्षांना जागा दिल्या नव्हत्या, म्हणून इंडियात काँग्रेसवर नाराजी आहेच. शिवाय निकालानंतर तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देश नॉर्थ व साऊथ विभाजीत झाला, अशी टिप्पणी झाल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले. देशभर राम मंदिराला मोठी प्रसिद्धी मिळत आहे, मग राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला किती महत्त्व मिळणार?, असा प्रश्न इंडियातील मित्र विचारत आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राहुल गांधी यांची यात्रेची वेळ चुकली, अशी टीका होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर काँग्रेसचे अधिर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट जारी करावी, अशी जाहीर मागणी केली. एवढी टोकाची भूमिका काँग्रेस घेणार असेल, तर काँग्रेस व तृणमूल काँग्रेस भाजपाच्या विरोधात एकत्र येऊन निवडणूक कशी लढणार? सीपीआयचे खासदार विनय विश्वम म्हणतात, “राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवितात तरी कशाला?, त्याचे
औचित्य काय?”
इंडिया आघाडीचे सूत्रधार म्हणून ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्याचे तत्काळ समर्थन केले. पण खरगे यांनीच तो फेटाळून लावला. अगोदर निवडणुका जिंकणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. नितीश कुमार यांना इंडियाचे निमंत्रक व्हायचे आहे, पण त्यावरही निर्णय होत नाही. दुसरीकडे गुजरातमधील जेलमध्ये असलेले आपचे नर्मदा जिल्ह्यातील देदीपाडामधून निवडून आलेले आमदार चैतर वसावा यांचे नाव लोकसभा उमेदवार म्हणून केजरीवाल यांनी जाहीर करून टाकले. काँग्रेसशी चर्चा करण्याची ते वाट बघत बसले नाहीत. खंडणी व वन अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी ते सध्या जेलमध्ये आहेत.
सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे अशा जंगी कलाकारांची इंडिया सर्कस जागा वाटपाच्या गर्तेत सापडली आहे.