नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल कधी सुरु होणार याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. याचवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन आयपीएल स्पर्धेचं नियोजन केलं जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतचा संपूर्ण प्लान सांगितला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार 22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. तर महिला प्रीमिअर लीग (Women Premier League) फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात खेळवण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे 2019 प्रमाणेच लोकसभा निवडणुकांच्या तारखा पाहून सामन्यांचं आयोजन केलं जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सामने खेळवले जाणाऱ्या शहरात लोकसभा निवडणुकीचा टप्पा असल्यास त्या शहरातील सामने इतर ठिकाणी खेळवले जाणार आहेत. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही बीसीसीआयने योजना तयार केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह हे आयपीएल भारतात खेळवण्यासाठी आग्रही आहेत. बीसीसीआय आणि केंद्र सरकारमध्ये याबाबत बातचीत झाल्याचंही सांगण्यात येतंय. लोकसभा निवडणूका विविध टप्प्यात होईल, याच्या तारखा पाहून त्यानुसार त्या त्या शहरात आयपीएल सामन्यांचं नियोजन केलं जाणार आहे. त्यामुळे सुरक्षेवरही ताण येणार नाही अशी माहिती आहे.
याआधी 2009 आणि 2014 साली लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलची स्पर्धा परदेशात खेळवण्यात आली होती. 2009 मध्ये ललित मोदी आयपीएल कमिश्नर होते. त्यावेळी संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेता आयोजित करण्यात आली. तर 2014 मध्ये 20 सामने यूएई, आबूधाबी, दूबई आणि शारजाहात खेळवण्यात आले होते. 2 मेनंतरचे सर्व सामने भारतात खेळवण्यात आले होते. पण 2019 लोकसभा निवडणूक आणि आयपीएल स्पर्धा एकत्र झाली होती.
दरम्यान महिला क्रिकेट प्रीमिअर लीग फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात खेळवण्यात येईल. यावेळी डब्ल्यूपीएलचं (WPL)आयोजन दिल्ली आणि बंगळुरु शहरात करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी महिला प्रीमिअर लीगचे सर्व सामने मुंबईत खेळवण्यात आले होते. पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावलं होतं. महिला प्रीमिअर लीगमधअये पाच संघांचा समावेश आहे. यात मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात जायंट्स आणि युपी वॉरिअर्स संघांचा समावेश आहे.