मंडणगड : जलजीवन मिशनमधील प्रत्येक कामाची चौकशी लावणार : आ. योगेश कदम

मंडणगड येथे आयोजीत पाणी टंचाई सभेस उपस्थित आमदार योगेश कदम समस्या मांडणारे ग्रामस्थ व अधिकारी वर्ग.
अधिकाऱ्यांचे कामावर तीव्र नाराजी, खडेबोल सुनावत चौकशी तंबी

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड तालुक्यातील जलजीवन मिशन आंर्तगत कामाचा आढावा घेताना, समोर आलेल्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची कार्यपध्दती व कामामधील हलगर्जीपणावर नाराज झालेल्या आ. योगेश कदम यांनी मतदार संघातील तिन्ही तालुक्यात मंडणगड तालुक्याचा पाणी पुरवठा विभागाचा कामाचा रिपोर्ट निकृष्ठ दर्जाचा असल्याचे सांगत जलजीवन मिशनचे तालुक्यातील सर्व कामांची चौकशी लावणार असल्याचे प्रतिपादन केले.

तहसिल कार्यालयाचेवतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात 10 जानेवारी 2024 रोजी आयोजीत करण्यात आलेल्या पाणी टंचाई कृती आरखड्याच्या सभेत ते बोलत होते. या सभेस प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसिलदार तानाजी शेजाळ, गटविकास अधिकारी विशाल जाधव, पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता श्रीमती प्रतिभा शेरकर, श्री. विष्णु पवार, प्रशासकीय यंत्रणातील सर्व अधिकारी सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार योगेश कदम यांनी प्रथम गतवर्षी टंचाई निर्माण झालेल्या गावांचा सद्यस्थितीचा आढावा घेत सभेस सुरुवात केली. दरम्यान धुत्रोली गावातील ग्रामस्थ इरफान बुरोंडकर यांनी धुत्रोली येथील जलजीवन मिशन अंर्तगत बांधण्यात आलेल्या टाकीचा प्रश्न उपस्थित करीत अंदाज पत्रकात बारा मीटरची टाकी नोंद असताना ठेकेदारास सहा मीटरचे कामाचे पत्र पाणी पुरवठा विभाग मंडणगड यांनी ठेकेदारास दिलेले असल्याचे गंभीर बाब सभागृहासमोर माहीतीसाठी आणली यावर अधिकारी वर्गाने दिलेले उत्तरे यावर आमदार कदम यांनी चांगलेचे ताशेरे ओढले व त्यांच्या या कार्यपध्दतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या निमीत्ताने धुत्रोली हे गाव अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणामुळे गेली तीन वर्षे पिण्याच्या पाण्यापासून वंचीत राहीलेले असल्याची गंभीर बाब सभागृहासमोर आली.

जलजीवन मिशन योजना राबविताना लागणाऱ्या जागेच्या बक्षीस पत्रा विषयीचा मुद्दा पुढे आल्यानंतर ग्रामसेवक यांनी पाणी पुरवठा विभागाकडून समंत्तीपत्रच आपेक्षीत असल्याचे आम्हास सांगण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देत बक्षीस पत्राबाबत पाणी पुरवठा विभागाने आम्हास कोणत्याही सुचना व पत्र दिलेले नाही असे सांगीतले. तर पाणी पुरवठा अधिकारी श्रीमती प्रतिभा शेरकर यांनी बक्षीस पत्राबाबत ग्रामसेवकांनी लेखी पत्र दिल्याचे सांगीतले. यावरुन प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात अजीबात समन्वय नसल्याची गंभीर बाब पुढे आली. यावेळी नारगोली, कुडुकखुर्द, कादवण, आदी गावातील सरपंच सदस्य ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या यामध्ये गतवर्षी नारगोली गावाची मागणी असतानाही मे मध्ये प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा न करण्यात आल्याची गंभीर बाबही पुढे आली. कादवण येथील योजना राबविताना अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष व हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले. या सर्व प्रकारावर आमदार योगेश कदम यांनी गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी यांना धारेवर धरत त्याना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन दिली तसेच संवेदनशील राहून काम करावे असे सुचीत केले.

गतवर्षीच्या टंचाई आरखाड्यात समाविष्ठ असलेल्या सहा कामांपैकी चार कामे अद्याप पुर्ण झालेली नसल्याची बाब या निमीत्ताने पुढे आली याशिवाय नमुद सहा कामापैकी पाच कामे एकाच ठेकेदाराचे नावावर असल्याचने आमदार कदम यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदरीत ही सभा अधिकाऱ्यांच्या कामामधील हलगर्जीपणामुळे निर्माण झालेल्या समस्यांनीच गाजली. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेकरिता विशेष बैठक लावण्याची घोषणा आमदारांनी यावेळी केली व बैठकीत झालेल्या निर्णयांची सात दिवसात अंमलबजावणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.