मानवानं मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधनाच्या वापराला सुरुवात करण्याच्या आधीच्या दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत मागचं वर्ष हे 1.48 अंशांनी अधिक उष्ण असल्याचं, युरोपियन महासंघाच्या हवामान विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानानंही यापूर्वीचे उच्चांक मोडीत काढले आहेत.
मानवातर्फे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडसारख्या हरितगृह वायूंचं विक्रमी प्रमाणात उत्सर्जन केलं जात आहे. त्यामुळं सध्याचं जग हे 100 वर्षांपूर्वी होतं, त्यापेक्षा खूप जास्त उष्ण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पण 12 महिन्यांपूर्वी कोणत्याही प्रमुख विज्ञान संस्थेनं 2023 हे आजवरचं सर्वांत उष्ण वर्ष ठरेल असा अंदाज वर्तवला नव्हता. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सध्या पृथ्वीवरील हवामान अत्यंत क्लिष्ट पद्धतीनं वर्तन करत आहे. 2023 च्या नंतरच्या सहा महिन्यांमध्ये जगामध्ये नवनव्या आणि न मोडता येणाऱ्या विक्रमांची एक साखळी पाहायला मिळाली.
गेल्या काही काळातील तापमानातील वाढ ही प्रामुख्यानं एल निनोमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहेत. त्यामुळं दीर्घकालीन मानवनिर्मित उष्णतेची सर्वोच्च पातळी गाठली आहे. अल निनो ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यात पूर्व प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील गरम पाण्यामुळं वातावरणात अधिक उष्णता पसरते. पण, या एल निनोच्या टप्प्याच्या सुरुवातीलाच हवेतील तापमानात असामान्य अशी वाढ पाहायला मिळाली आहे. एल निनो त्याच्या सर्वोच्च पातळीवर 2024 च्या सुरुवातीपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवलेली नव्हती. त्यामुळं हवामानामध्ये नेमका कशा प्रकारचा बदल होणार याबाबत शास्त्रज्ञांना नेमकी काहीही खात्री नाही.
2023 मधील उष्णतेचं आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे ती बऱ्याच अंशी जगभरात सर्वच ठिकाणी जाणवली. जगाचा जवळपास संपूर्ण भाग हा अलीकडच्या 1991-2020 या काळाच्या तुलनेत उष्ण होता. यात कॅनडा आणि अमेरिकेतील उष्णतेची लाट आणि वणव्याच्या घटना तसंच पूर्व आफ्रिकेतील दीर्घकाळ चाललेला दुष्काळ आणि नंतरची पूरस्थिती यांचा समावेश होता.
हवेचं तापमान पृथ्वीच्या वेगानं बदलणाऱ्या हवामानाचं एकमेव मापक आहे. 2023 मध्ये
- अंटार्क्टिकमधील सागरी बर्फाची पातळी “आश्चर्यकारक” नीचांकावर पोहोचली आहे, तसंच आर्क्टिक मधील सागरी बर्फाची पातळीही सरासरीच्या खाली सरकली आहे.
- पश्चिम उत्तर अमेरिका आणि युरोपियन आल्प्समधील ग्लेशियरमध्येही जास्त प्रमाणात वितळण्याचा हंगाम पाहायला मिळाला, त्यामुळं समुद्राच्या पातळीत वाढ झाली.
- उत्तर अटलांटिकसह अनेक ठिकाणी समुद्राच्या उष्ण वाऱ्यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान उच्चांकांवर पोहोचल्याची नोंद झाली आहे.
- युकेच्या हवामान विभागानुसार, यामुळं 2024 मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण वर्षामध्ये 1.5 अंश उष्णता वाढीची पातळीही ओलांडली जाण्याची शक्यता अधिक वाढली आहे.