आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सावंतवाडीत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Google search engine
Google search engine

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची संकल्पना

शालेय व महाविद्यालयीन गटात होणार स्पर्धा

सावंतवाडी । प्रतिनिधी : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने छत्रपती शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आई सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सदर स्पर्धांचे आयोजन होत आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा इ. ७ ते १० व ११ वी ते १५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अशी दोन गटात होणार आहे. तरी या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली नावे भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी कार्यालयात १४ फेब्रुवारी पर्यंत नोंद करावीत असे आवाहन भाजपचे बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडळ अध्यक्ष रवी मडगावकर तसेच भाजपा शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केले आहे.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात १६ फेब्रुवारी रोजी ही वक्तृत्व स्पर्धा होणार असून सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत इयत्ता ७ ते १० वी (वयोगट ) तर अकरावी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांकरिता दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून स्पर्धेतून विजयी प्रथम ५ विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
शालेय गटासाठी म्हणजे इयत्ता ७ वी ते १० वी साठी वक्तृत्व स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, स्वामी विवेकानंद एक योद्धा संन्यासी,
माझा देश महासत्ता होणार,
स्वातंत्र्यवीर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड, चला विज्ञानवादी होऊया
हे विषय आहेत. या वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ ६ मिनिटे आहे.
या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक रुपये १५ हजार, द्वितीय रुपये १० हजार, तृतीय ५ हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिके देण्यात येणार असून उत्तेजनार्थ रुपये ३ हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तर महाविद्यालयीन गट अर्थात इ. ११ वी ते सिनियर कॉलेजसाठी विषय पुढील प्रमाणे आहेत.
भारत महासत्तेच्या दिशेने,
G-20 आणि भारत एक नवीन प्रारंभ,
बुद्धीवादी विज्ञानवादी सावरकर,
सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दिशा,
देश महासत्ता होताना युवकांचे योगदान व त्यांच्या अपेक्षा,
माझा देश बदलतोय घडतोय झेपावतोय,
छत्रपती शिवराय वेगळेपण आणि द्रष्टेपण हे विषय देण्यात आले आहेत. या वक्तृत्व स्पर्धेसाठी वेळ ९ मिनिटे आहे.
या गटातील विजेत्यांसाठी प्रथम क्रमांक रुपये २५ हजार, द्वितीय रुपये १५ हजार, तृतीय १० हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिके देण्यात येणार असून उत्तेजनार्थ रुपये ५ हजार व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तरी या वक्तृत्व स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.