भारताच्या रणरागिणींचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय

महिला टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात विजयी मुहुर्तमेढ

पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांवर महिला संघानेही केली मात

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात सामनावीर जमैमा रॉड्रीक्सच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकाच्या ५३(३८) जोरावर भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजय प्राप्त करीत विजयाची मुहूर्तमेढ रोवली. सलामीवीर शेफाली वर्मा ३३(२५) व रिचा घोष नाबाद ३१ (२०) च्या साथीने भारतीय रणरागिणींनी हा दिमाखदार विजय संपादन केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी महिला संघाने मर्यादित २० षटकांत ४ बाद १४९ धावा करीत १५० धावांचे कठीण लक्ष्य भारतीय महिला संघासमोर ठेवले होते. त्यात पाकिस्तानची कर्णधार बिसमहा मरूफ नाबाद ६८(५५) व आयेशा नसीम नाबाद ४३(२५) यांनी धडाकेबाज खेळी करत मौल्यवान योगदान दिले होते.

भारताची स्टार सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत फलंदाजीस उतरलेल्या भारतीय महिला संघाने अशक्यप्राय वाटणारे हे आव्हान संयमी व तेवढीच आक्रमक खेळी करत मोडीत काढले. चौदाव्या षटकात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर १६(१२) बाद झाल्यावर विजय थोडासा भारतीय संघापासून दूर जात असल्याचे दिसत असतानाच रिचा घोष व सामनावीर जमैमा रॉड्रीक्सच्या बहारदार खेळीने भारतीय संघाचा विजय सोपा केला. भारतीय संघाला २४ चेंडू ४१ धावा आवश्यक असताना दोघांनी चौफेर फलंदाजी करत विजयाचे लक्ष्य जवळ आणले. तर रिचा घोष हिने एका षटकात तीन चौकार लगावत १२ चेंडूत १४ धावा करीत भारताचा विजय साकार केला.