रत्नागिरी मध्ये भावार्थ मैफल पुष्प ६ वे ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : TWJ Foundation तर्फे भावार्थ मैफल पुष्प ६ वे ही सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची अजरामर मराठी व हिंदी गाण्यांची सुश्राव्य मैफल गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली. यात राहुलजी देशपांडे यांच्या एकापेक्षा एक सुरेल गाण्यांच्या मैफलीला रत्नागिरीकर रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.मनमोकळ्या व रंगतदार गप्पा आणि गाणी असे या मैफलीचे स्वरूप होते. यावेळी TWJ फाऊंडेशनचे संचालक श्री. प्रसन्न करंदीकर यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत राहुलजींशी संवाद साधला. राहुलजींनी त्यांचे आजोबा गायक, पंडित वसंतराव देशपांडे यांच्या अनेक आठवणींना उजाळा त्यांची प्रसिद्ध नाट्यगीते सादर करित मैफल बहारदार केली. राहुल यांनी पुलं बद्दल सांगताना म्हणाले की ‘मी पूर्णवेळ संगीतात पु. ल. देशपांडे (भाई ) यांच्यामुळे आलो आणि वेळोवेळी त्यांचे मोलाचे मार्गदर्शनही मला लाभले.’ ते पुढे म्हणाले की, ‘ मी ६-७ वर्ष पिंपळकर बुवा यांच्याकडे गाणं शिकत असताना मला गाण्याची आवड निर्माण झाली नाही, पण पुढे किशोर कुमारांचे निधन झाल्यावर त्यांच्या गाण्याच्या कॅसेट्स ऐकल्या आणि त्या ऐकून गाण्याची आवड निर्माण झाली. आजोबांचा सहवास कमी लाभला, कारण माझ्या लहानपणीच त्यांचे निधन झाले.

पण गाण्यात करिअर करावे असा मानस असल्यामुळे त्यांच्या फोटोसमोर रोज ८ ते १० तास बसून तब्बल १२ वर्ष संगीताचा रियाज केला.’ राहुल यांचे आवडते संगीतकार म्हणजे हृदयनाथ (बाळासाहेब) मंगेशकर. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की कोरोना काळात त्यांना हृदयनाथजींचा फोन आला. ते राहुलजींना म्हणाले की ‘तुम्हाला गायकीचे मर्म कशात आहे हे समजले आहे.’ आणि हे शब्दच त्यांना कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लतादीदींच्या आठवणीत रमून ते म्हणाले की “देवाला येऊन गाता आलं नाही म्हणून देवाने लतादीदींना पाठवले.”

संगीतकार म्हणून त्यांचा सुरु असलेला प्रवास उलगडताना ते म्हणाले की, ‘संगीतकाराने नेहमी प्रामाणिक राहिले पाहिजे. आपल्याला एखादी चाल सुचली की ती कुठून आणि त्याचा संदर्भ काय याचाही ऋणनिर्देश म्हणून उल्लेख केला पाहिजे.’ कार्यक्रमाचा शेवट ‘कानडा राजा पंढरीचा’ व विठ्ठल नामाच्या गजराने झाला. या भक्ती गीतात समस्त रत्नागिरीकर टाळ्यांच्या गजरात सामील झाले आणि पूर्ण वातावरण जणू विठ्ठलमय झाले! ही अविस्मरणीय संगीत मैफल खातू नाट्यमंदिर, गोगटे – जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगली होती.या सोबतच TWJ फाऊंडेशनद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते २ या वेळेत TWJ ग्रुप ऑफ कंपनीमधील विविध “नोकरी व व्यवसाय संधी” यांचे मार्गदर्शन परिसंवादाद्वारे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. TWJ च्या प्रत्येक कंपनीची आवश्यक माहिती विद्यार्थी व कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांचे अनेक काउंटर्सदेखील उपलब्ध करून देण्यात आले होते.
यावेळी TWJ फाऊंडेशनच्या ‘कला-आरंभ’ या कला विभागाद्वारे उत्कृष्ट व दर्जेदार चित्रांचे दोन दिवसीय (दि. ४ व ५ रोजी) प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये आर्टिस्ट व स्केचिंग तज्ञ श्री. सर्वेश दाभोळकर आणि त्यांची टीम यांच्यासह परिसरातील अनेक उदयोन्मुख कलाकारांच्या चित्रकृतींचा समावेश होता. मैफलीच्या समारोपाप्रसंगी श्री. राहुलजी देशपांडे यांना त्यांचे आणि त्यांच्या गोड मुलीचे कला आरंभ चमुने रेखाटलेले चित्र ‘भावार्थ भेट’ म्हणून देण्यात आले आणि ते त्यांना खूप आवडले देखील!

या सर्व कार्यक्रमास रत्नागिरीकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या प्रचंड प्रतिसादाने आयोजक भारावून गेले व यापुढेही असेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम रत्नागिरीमध्ये आयोजित करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.या सुरेल मैफलीचे सूत्र संचालन प्राजक्ता जोशी यांनी केले. या कार्यक्रमास TWJ चे संचालक श्री. समीर नार्वेकर आणि इतर कंपन्यांचे अनेक पदाधिकारी, कर्मचारी, रत्नागिरी शहरातील सन्माननीय व्यक्ती तसेच मोठया संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रम TWJ रत्नागिरी शाखेच्या व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांच्या उत्तम योगदान व नियाजनामुळे यशस्वीरित्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे, TWJ ग्रुप ऑफ कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे, कला आरंभ व भावार्थ या दोन्ही चमुंचे मोलाचे सहकार्य लाभले.