सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारणीनंतर प्रदेश कार्यकारणी नाशिक येथे संपन्न झाली. त्यानंतर जिल्ह्याची कार्यकारणी घ्यायची असून यापुढील जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका जिल्ह्यात एकाच ठिकाणी घेण्याऐवजी जिल्ह्यातील विविध भागात घ्याव्यात, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवार १५ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी शहरातील वैश्य भवन हॉलमध्ये प्रथमच भाजपची जिल्हा कार्यकारणी होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.या जिल्हा कार्यकारणी बैठकीला प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अलीकडेच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्यात येईल. तसेच कृषी व सहकार प्रस्ताव त्याचप्रमाणे लोकसभा प्रवास व भाजपच्या अन्य कार्यक्रमाबाबत चर्चा केली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई खात्याच्या अंतर्गत उपलब्ध निधी तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यास साठी मंजूर करण्यात आलेला निधी याबाबतची माहिती ही या कार्यकारणीत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे मिशन २०२४ संदर्भातील पक्षाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार यावेळी विचार विनिमय व चर्चा होणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा कार्यकारणी बरोबरच आगामी तीन-चार दिवसात तालुका मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक देखील वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदार संघात घेतली जाणार आहे. सर्व भागांचा समावेश करून घेणे हा यामागील उद्देश असून पार्टीने ठरवून दिलेल्या रचनेप्रमाणे यापुढे कार्यकारणीच्या बैठका घेतल्या जातील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपचे जिल्हाप्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुका मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, महेश धुरी, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, जिल्हाचिटणीस मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते.