( प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शृंगारतळीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन )
पाटपन्हाळे (वार्ताहर ) प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय , शाखा शृंगारतळी, तालुका – गुहागर , जिल्हा – रत्नागिरीतर्फे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मंगळवार दि.१४ फेब्रुवारी ते रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ या सहा दिवसाच्या कालावधीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाशिवरात्रीनिमित्त प्रतिकात्मक अकरा फुटी शिवलिंग , त्रिशूल , धबधबा व प्रतिकात्मक गुहा साकारून बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती सादर करून शिवभाविकांना दर्शनाचा लाभ मिळणार आहे. तसेच विविध पथप्रदर्शक म्हणून वैल्यू गेम्स , अध्यात्मिक चित्र प्रदर्शनी , यशस्वी व्यापारासाठी पाऊल , व्यसनमुक्ती राजयोग अनुभूती , अध्यात्मिक साहित्य हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.स्त्री शक्तीसाठी मार्गदर्शन कार्यक्रम, गुहागर तालुका सरपंचांचा सन्मान सोहळा , योगा व तणाव मुक्ती शिबिर यांसारखे कार्यक्रम साजरे होणार आहेत.
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय , शाखा – शृंगारतळी , ता.गुहागर , जिल्हा- रत्नागिरीतर्फे मंगळवारी १४ फेब्रुवारी ते रविवारी १९ फेब्रुवारी २०२३ या सहा दिवसांच्या कालावधीत आगळ्या – वेगळ्या , समाज उपयुक्त व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाटपन्हाळे हायस्कूल या ठिकाणी सकाळी १०.३० वा. गुहागर तहसिलदार श्रीमती प्रतिभा वराळे , ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका व पुणे क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी सुनंदा दीदी या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजकांतर्फे प्रतिकात्मक गुहा साकारून त्यामध्ये दिनांक १४ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२३ या सहा दिवसांच्या कालावधीत सोमेश्वर , त्र्यंबकेश्वर , मल्लिकार्जुन , ओंकारेश्वर , घृष्णेश्वर , केदारनाथ , महाकालेश्वर , भिमेश्वर , रामेश्वर , नागेश्वर , विश्वेश्वर व वैद्यनाथ या बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती साकारून शिवभाविकांसाठी दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.साकारलेल्या गुहेच्या समोर अकरा फुटी शिवलिंग प्रतिमा सादर करून त्रिशूलाची प्रतिमाही साकारण्यात येणार आहे .तसेच धबधबा प्रतिकृती भाविकांसाठी प्रेक्षणीय व आकर्षक पर्वणी लाभणार आहे. महोत्सवानिमित्त विविध पथक प्रदर्शक म्हणून वैल्यू गेम्स , अध्यात्मिक चित्र प्रदर्शनी , यशस्वी व्यापारासाठी पाऊल , व्यसनमुक्ती , राजयोग अनुभूती व अध्यात्मिक साहित्य हे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. गुहागर तालुक्यातील सरपंच महोदय यांचा मंगळवारी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३.३० वाजता सन्मान सोहळा ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका व पुणे क्षेत्रीय संचालिका राजयोगिनी सुनंदा दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.बुधवारी १५ फेब्रुवारी ते शुक्रवारी १७ फेब्रुवारी २०२३ या तीन दिवसाच्या कालावधीत सकाळी ६.३० ते ८.०० वा. या वेळेत योगा व तणाव मुक्ती शिबिर संपन्न होणार आहे.
नारी ही शक्तीचे प्रतिक आहे . आई , सहचारिणी , बहिण , सखी , शिक्षिका अशा विविध रूपांमध्ये नारी शक्ती ही स्नेहरूपाने मार्गदर्शन करीत असते. कुटुंब व समाजाला साथ देत असते .म्हणूनच या नारीशक्ती व शिवशक्तीला सदैव अग्रक्रम देण्यात येतो .सुखी परिवार ठेवण्यासाठी नारी शक्ती अत्यंत महत्त्वाची असते .महिलांचे मोल व महान कार्य लक्षात घेऊन गुरुवारी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी ” सुखी परिवाराची आधारशिला नारी ” या विषयानुसार दुपारी ३.०० वा. पाटपन्हाळे हायस्कूल या ठिकाणी महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला असून डॉ.सचिन परब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदरच्या आयोजित कार्यक्रमासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय , शाखा शृंगारतळीच्या संचालक राजयोगिनी शिल्पा बेहनजी , शृंगारतळी केंद्रप्रमुख सुचिताताई वेल्हाळ यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा गुहागरतर्फे अनेकदा संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी गुहागरच्या संचालिका राजयोगिनी शिल्पा बेहनजी , शृंगारतळी केंद्रप्रमुख सुचिताताई वेल्हाळ , भारती पटेल , भवरी परमार , विजया मेस्त्री , सविता संसारे , प्रगती विखारे , प्रिया वेल्हाळ , वैशाली वेल्हाळ , किरण वेल्हाळ , सुजाता चव्हाण , निर्मला पटेल , अस्मिता विचारे आदी नारीशक्तींचे विशेष मोलाचे सहकार्य असते. महाशिवरात्री कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या विशेष आकर्षक व खास वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसाठी गुहागर तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी व शिवभक्तांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय ,शाखा शृंगारतळीतर्फे करण्यात आले आहे.