गिमवी येथील तलाठी कार्यालयाची शासकीय इमारत जीर्ण अवस्थेत इमारतीची त्वरित दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधावी मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर

गुहागर l प्रतिनिधी:गुहागर तालुक्यातील मौजे गिमवी येथे गिमवी,देवघर रामाणेवाडी तर्फे काळसुर कौंढर या गावांसाठी असलेली तलाठी सजेची इमारत जीर्ण झाली असून सदर इमारतीची त्वरित दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत बांधावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.

याबाबत गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यांना या इमारतीची त्वरित दुरुस्ती किंवा नवीन इमारत बांधण्या संदर्भात मनसे गुहागरचे सह संपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांनी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी गुहागर तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर गुहागर तहसीलदार यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग गुहागर यांना गिमवी येथील तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस आली असून ती बंद अवस्थेत असल्याबाबत ती त्वरित दुरुस्ती करण्यात यावी असे पत्र देण्यात आले होते, परंतु अद्याप या पत्राबाबत जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग गुहागर कडून कार्यवाही करण्यात आली नाही. या इमारतीची सद्यस्थितीमध्ये दुरावस्था झाली असून सदरची इमारत बंद अवस्थेत आहे, परिणामी हे कार्यालय गावातील नागरिक सिताराम केशव जाधव यांच्या घरात थाटले गेले आहे. अशी गंभीर बाब असून देखील या इमारतीची दुरुस्ती किंवा नवीन इमारत तयार करून या ठिकाणी तलाठी सजाचे कामकाज सुरू करावे व जनतेला दिलासा द्यावा ही अपेक्षाही विनोद जानवळकर यांनी केली आहे.

या संदर्भामध्ये गुहागर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार अमोल प्रभू देसाई यांनी सर्व मंडळ अधिकारी यांना दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी शासकीय कार्यालयाची दुरुस्ती व डागडुजी बाबत पत्र दिले होते.या पत्रात महसूल विभागासाठी मूलभूत व पायाभूत सुविधा निर्माण करणे,तलाठी मंडळ अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे इत्यादी प्रयोजनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यास मान्यता दिली आहे,ज्या मंडळातील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयामध्ये मूलभूत व पायाभूत सुविधा तसेच दुरुस्ती व डागडूजी करणे आवश्यक आहे अशा मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयाच्या दुरुस्तीवर डागडूजी करण्याबाबतचे प्रस्ताव कार्यालयात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु यावर अद्यापही कुठल्या प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे विनोद जानवळकर यांनी सांगितले.