भाजपचे माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांचा आरोप
दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी : मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरु असलेले कामाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरही उपस्थित नाही. त्यामुळे ते काम निकृष्ठ व दर्जाहीन होत असल्याचा आरोप भाजपाचे माजी शहराध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर यांनी केला असून अधिकाऱ्यानी स्वतः उपस्थित राहून हे काम करुन घ्यावे अन्यथा काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला.सावंतवाडी शहरातील मोती तलावात साचलेला गाळ काढण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संजू शिरोडकर यांनी सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर नागरिकांच्या सततच्या मागणीनंतर प्रशासनाने हे काम हाती घेतले होते. मात्र गाळ काढण्याचे काम सुरू असताना जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने रस्त्यालगतच्या संरक्षक भिंतीला धोका पोहोचू ती कोसळली होती.
सद्यस्थितीत ही कोसळलेली भिंत हटवून ती नव्याने बांधण्यात येत आहे. गेले काही दिवस याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम होत असताना त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा जबाबदार अधिकारी उपस्थित असणे गरजेचे असताना या ठिकाणी बांधकाम विभागाचा कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने खोदलेल्या मातीवरच काँक्रीट ओतून काम रेटण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदाराकडून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. तर जबाबदार प्रशासनाकडून त्या ठिकाणी डोळे जाग होत असल्याचेही दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत भाजपाचे माजी शहर अध्यक्ष ॲड.संजू शिरोडकर यांनी नाराजी दर्शवली असून त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली त्यात त्यांनी असे म्हटले की, बांधकाम विभागाचा जबाबदार अधिकारी नसताना कोसळलेल्या कठड्याचे काम सुरू आहे, त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होण्याची दाट शक्यता आहे. लाखो रुपये खर्च करून होणारे हे काम दर्जेदार होणे गरजेचे आहे. त्या ठिकाणी दर्जाहीन काम झाल्यास भविष्यात पुन्हा कठडा कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी या कामाकडे जातीने लक्ष देऊन हे काम दर्जेदार करून घ्यावे तसेच त्या ठिकाणी बांधकामचा जबाबदार अधिकारी तैनात ठेवून त्यांच्या देखरेखीखाली हे काम
व्हावे अन्यथा नागरिकांना घेऊन सदरचे काम बंद पाडण्यात येईल येईल.
कठड्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणताही धोका नजीकच्या महामार्गाला होता नये. काम करताना मुळातच चुकीच्या पद्धतीने आणि दर्जाहीन झाल्यास त्याचा परिणाम काही वर्षांनी दिसून येऊ शकतो. त्यामुळे आत्ताच सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि स्थानिक नगरपालिका प्रशासनाने याकडे जातीनिशी लक्ष घालावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.