वैभववाडीत स्टॉल धारकांची बैठक संपन्न
वैभववाडी | प्रतिनिधी
येथील शहरातील स्टॉल धारकांना लवकरच हक्काचे स्टॉल अथवा एकत्रित गाळे बांधून देणार तसेच त्यांचे पुनर्वसन शहरातच करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. जिल्ह्यातील आदर्शवत असे हे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे स्टॉलधारक गुरुवारी आपले स्टॉल काढून घेतील अशी माहिती स्टॉलधारक संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दिले आहे.
अर्जुन रावराणे विद्यालय येथे जयेंद्र रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली स्टॉल धारकांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे. वैभवाडी शहरातील स्टॉल धारक गेली अनेक वर्ष या स्टॉलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. वैभववाडी नगरपंचायतने शहराच्या विकास कामांसाठी शहरातील स्टाॕल हटविणार अशी नोटिस दिली होती. माञ स्टॉलधारकांचे पुनर्वसन शहरातच करा. त्यानंतर स्टाॕल हटवा अशी मागणी आम्ही लावून धरली होती. आमदार राणे यांनी स्टॉल धारकांच्या विनंतीला मान देऊन शहरातील स्टॉल धारकांना वैभववाडी येथील शासकीय गोडाऊन नजीक गाळे उभारून त्या ठिकाणी त्यांना एकत्रित जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार राणे यांच्या आश्वासनानुसार शहरातील स्टॉलधारक गुरुवारी स्वतःहून आपले स्टॉल काढून घेणार आहेत. स्टॉल धारकांना तात्पुरती जिल्हा परिषद विश्रामगृह येथील जागेत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. तर गौरी गणपती विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिकन, मटन, मच्छी विक्रीसाठी तात्पुरती जागा देण्यात येणार आहे. भविष्यात मटन, मच्छी मार्केटची जागा निश्चित करून त्या ठिकाणी मार्केट उभारण्यात येणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.