वेंगुर्लेत होणार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन

Google search engine
Google search engine

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन : राज्यभरातून सुमारे एक लाख शिक्षक उपस्थिती राहणार..

समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

वेंगुर्ले : दाजी नाईक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा-शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्याय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गेली ६१ वर्षे चळवळीत अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन व शिक्षण परिषद वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारी रोजी शिक्षण परिषद व सत्कार समारंभ तर १६ फेब्रुवारी रोजी १७ त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशन होणार आहे. या महा अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर केंद्रीय सूक्ष्म व लघु मध्यम, उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवरांसह राज्यभरातील सुमारे एक लाख शिक्षक यावेळी उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष शिंदे यांच्यासह राज्य सरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे होय तसेच नामदेव जांभवडेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सिताराम लांबर, भाऊ आजगावकर, संतोष परब, वासुदेव कोळंबकर, संतोष बोडके, प्रसाद जाधव यांच्यासह अन्य शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.
कॅम्प येथे हे अधिवेशन होत आहे उद्या १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण परिषद व सत्कार समारंभ होणार आहे. नवीन शिक्षण धोरण, संगणकीकृत प्रणालीतील अडथळे यावर चर्चा तसेच राज्यातील तज्ञ ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य सुनील लवटे यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सत्कार होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या हस्ते होणार आहे.
तर गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी १७ व्या त्रैवार्षिक राज्य अधिवेशनाचे सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, वैभव नाईक, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच शिक्षक नेते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाची जोरदार तयारी वेंगुर्ले येथे सुरू आहे. या अधिवेशनातच पुढील तीन वर्षासाठी राज्य कार्यकारणी निवडली जाणार आहे. आमची संघटना गेली ६१ वर्षे शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी चळवळ म्हणून कार्य करत आहे. या महाअधिवेशनातही शिक्षकांच्या विविध मागण्या यामध्ये शिक्षकांची रिक्त पदे, नवीन शिक्षक भरती, वस्ती शाळांचा प्रश्न, घर भाडे आदींवर चर्चा करून शिक्षकांच्या अतिरिक्त कामाकडे शासनाने लक्ष पुरवून शिक्षणातील गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांना सहकार्य करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही बदलत्या शिक्षण प्रणालीचा फायदा व्हावा यासाठी सर्व सोयी शासनाने उपलब्ध करावेत यास सर्वच मागण्यांबाबत या अधिवेशनात साधक बाधक चर्चा होईल असे शिंदे यांनी सांगितले. हे अधिवेशन वेंगुर्ले येथे घेत असताना वेंगुर्ले नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. या अधिवेशनातून जाताना शिक्षकांना नवी ऊर्जा मिळेल असा विश्वासही श्री शिंदे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्गातील शाळांना १६ फेब्रुवारी रोजी एक दिवस विशेष सुट्टी जाहीर..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या या महाधिवेशनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सहभागी होता यावे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय विशेष सुट्टी जाहीर केली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासन, शिक्षण विभाग यांचे विशेष आभार यावेळी समितीच्या वतीने मानण्यात आले.
समितीच्या सिंधुदुर्ग शाखेचे राज्य समितीकडून कौतुक
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची सिंधुदुर्ग जिल्हा शाखा उत्कृष्ट व पारदर्शक काम करत आहे. दरवर्षी लेखापरीक्षणासह विविध उपक्रम ही शाखा घेत आहे. त्यामुळे या शाखेचे विशेष कौतुक यावेळी समितीचे राज्याध्यक्ष शिंदे यांनी केले.