राजापुरात कोंढेतड येथे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालीका जखमी

Google search engine
Google search engine

न. प. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा सुरू झाला असून मंगळवारी शहरातील कोंढेतड येथील एका दहा वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत नगर परिषद प्रशासाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि या भडक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

राजापूर शहरात फिरणारे भटके कुत्रे आणि मोकाट जनावरांचा उपद्रव ही शहर वासीयांसाठी नित्याची बाब बनली आहे. यापूर्वी अनेकदा मोकाट जनावरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. मात्र या समस्येतून अद्यापही शहरवासीयांची सुटका झालेली नाही. भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतही तसेच चित्र पहायला मिळत आहे. यापूर्वी नगरपरिषदेने दोन ते तीन वेळा भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली आहे. मात्र तरीही शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही.

मंगळवारी शहरातील कोंढेतड येथील सानिया इरफान मालीम या दहा वर्षीय मुलीवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यामध्ये सानिया हीच्या पायाला अनेक ठिकाणी कुत्र्याने चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. मनसेचे शहरअध्यक्ष अजीम जैतापकर यांनी सदर मुलीला तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे कोंढेतड परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

राजापूर शहरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरताना दिसत असून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्याचे पकारही सुरू आहेत. शिवाय रात्रीच्या वेळी रस्त्यात ठाण मांडून बसणाऱया कुत्र्यांमुळे अपघातही होत आहेत. राजापूर नगरपरिषदेने नसबंदी केलेली असतानाही कुत्र्यांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसेचे शहरअध्यक्ष अजीम जैतापकर यांनी केली आहे.