गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरूपासाठी सीसीटीव्हीचे योगदान महत्वाचे

Google search engine
Google search engine

पोलीस उपअधीक्षक डॉ.सचिन बारी यांचे प्रतिपादन

गुहागर | प्रतिनिधी : सध्या जग झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानाच्या युगात आता गुन्ह्याचे स्वरूप देखील बदलत आहे.अशावेळी गुन्ह्याची उकल करण्यासाठी सीसीटीव्ही हे एक मोठे योगदान देणारे आहे,असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक डॉ. सचिन बारी यांनी केले.तळवली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या पाहणीसाठी आले असता ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते महेश शिगवण यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने गावातील महत्वाच्या ठिकाणी स्वखर्चाने सिसिटीव्ही कॅमेरे बसविले त्याची पाहणी करताना डॉ बारी यांनी सांगितले की,पोलीस खात्याने प्रोजेक्ट नेत्राची सुरुवात गुहागरमध्ये केली आहे.यासाठी तळवली ग्रामपंचायतनेदेखील पुढाकार घेऊन पोलीस यंत्रणेला चांगले सहकार्य केले आहे.तसेच गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत ती सर्व ठिकाणे दूरदृष्टी ठेऊन निवडली असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
गुहागर पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की,काळानुसार गोष्टी बदलत आहेत.भविष्यात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल करणे तसेच गुन्ह्यांची सत्यता पडताळणी देखील या यंत्रणेमुळे सोयीस्कर होऊ शकते.यामुळे चोरी करण्याचे धाडस देखील होणार नाही.
यावेळी सरपंच मयुरी शिगवण, सदस्य संतोष जोशी,सचिन कळंबाटे,पूर्वा पवार,मानसी पोफळे,पोलीस पाटिल विनोद पवार,सामाजिक कार्यकर्ते व प्रा.अमोल जडयाळ,पत्रकार आशिष कारेकर,प्रदीप चव्हाण,संतोष पवार आदि ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमोल जडयाळ यांनी तर आभार सदस्य संतोष जोशी यांनी मानले.