घरालगतची बंद पायवाट मोकळी न केल्याने गुळदुवेतील महिला करणार उपोषण

तहसिलदारांच्या आदेशानंतरही मंडळ अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीस टाळाटाळ

सांवतवाडी । प्रतिनिधी : तहसिलदारांनी आदेश करूनही घरालगत असलेली पारंपरिक पायवाट मोकळी करून मिळत नसल्याने गुळदुवे येथील लक्ष्मी लक्ष्मण जोशी या २६ जानेवारीला तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रशासनास सादर केले आहे. लक्ष्मी जोशी यांचे गुळदुवे येथे  सर्वे नंबर १९ हिस्सा नंबर ८ या जमिनीत त्यांचे घर आहे. घरापासून निघणारी पारंपारिक वाट सर्वे नंबर १९ हिस्सा नंबर ४ मधून ग्रामपंचायत रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने जाणे-येण्यापासून अडथळा निर्माण करण्यात आल्यामुळे १४ जणांविरुद्ध दावा दाखल केला. त्यात पायवाट खुली करण्याचा आदेश करण्यात आलेला होता.

या संदर्भात संबंधितांनी अपील केले. परंतु ते ११ ऑक्टोंबर २०२३ ला फेटाळण्यात आले. या संदर्भात त्या तहसीलदारांकडे गेल्या.पाय वाटेवरील अडथळा दूर करण्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश देण्याबाबत अर्ज केला. परंतु अद्याप पायवाटेचा अडथळा दूर झालेला नाही. पायवाट मोकळी करून देण्यास मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. तसेच तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे पायवाट खुली व्हावी यासाठी उपोषण करणार असल्याचे जोशी यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.