परकीयांचा सामना करण्यासाठी अफझलवध पराक्रमाचा अभ्यास आवश्यक – आफळेबुवा

Google search engine
Google search engine

मठ (ता. लांजा) : प्रतापगडावर अफझलखानाचा वध करताना शिवछत्रपतींनी गाजवलेल्या रौद्र पराक्रमानंतर हिंदवी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शत्रूला मोठा धाक बसला. आताच्या काळात भारताविरोधात अनेक देशांनी कंबर कसली आहे. त्याला तोंड देण्यासाठी शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे धडे आजही गिरवण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी आधी त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेली उपासना नीट समजून घेण्याची गरज असून, नंतरच ते धडे गिरवण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील ८०० वर्षे जुन्या असलेल्या श्री भवानी सोमेश्वर मंदिरात जयवंत कामत यांनी अतिरुद्र जप आणि महारुद्र स्वाहाकार अनुष्ठान आयोजित केले आहे. त्यानिमित्ताने काल (दि. १४ फेब्रुवारी) रात्री ‘अफझलखान वध’ या विषयावर आफळेबुवांचे कीर्तन झाले. तेव्हा ते निरूपण करत होते. कीर्तनाला ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. आफळेबुवांना रामकृष्ण करंबेळकर यांनी तबल्याची, तर हर्षल काटदरे यांनी ऑर्गनची साथ केली.

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशूळ नेत्रीं ज्वाळा, या संत नरहरी सोनारांच्या अभंगावर पूर्वरंगात बुवांनी निरूपण केले. भगवान शिवशंकरांवरच्या या अभंगातल्या प्रत्येक शब्दाचा ध्वन्यार्थ काय आहे, हे उदाहरणे देऊन त्यांनी समजावून सांगितले. उत्तररंगात शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर भाष्य करताना या अभंगातल्या वर्णनाची शिवरायांच्या कर्तृत्वाशी कशी सांगड घालता येईल, हेही बुवांनी सांगितले.

प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या सात हजार मावळ्यांनी अफझलखानाच्या २२ हजार सैनिकांना गारद केले. साधनांची कमतरता असली, तरी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा, प्रत्येक माणसाचा शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खुबीने उपयोग करून घेतला. उपासनेची शक्ती आणि शक्तीच्या उपासनेतून अशी रुद्रशक्ती आपल्या मनात जागृत करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या सहभागाची, उपासनेची, पाठिंब्याची गरज आहे, असे आफळेबुवा म्हणाले. समाजसेवा आणि उपासना या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत आणि त्या दोन्हींचीही आपल्याला, समाजाला गरज आहे. त्यामुळे यांपैकी एक गोष्ट करतो म्हणजे दुसऱ्या गोष्टीची गरज नाही असा गैरसमज करून घेऊ नये, असेही ते म्हणाले.

बुवा म्हणाले, शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडे असलेले अनेक मराठे सरदार आपल्याकडे वळवून घेतले, तरी शहाजीराजे त्यांच्याकडे का आले नाहीत, असा सवाल उपस्थित केला जातो; मात्र शहाजीराजांनी आदिलशहाकडे राहून शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप मदत केली आणि स्वराज्यनिर्मितीला मोठा हातभार लावला. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेटच झाली नव्हती, वगैरे गोष्टी सांगून आजच्या काळात बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र विजापुरातून अफझलखान स्वराज्यावर चालून निघाला तेव्हा समर्थांच्या तेथील मठातून शिवाजी महाराजांना सांकेतिक भाषेत गेलेले पत्र आजही उपलब्ध आहे. तसेच जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यावरच्या चढाईपूर्वी समर्थांचे शिवथरघळीत असलेले वास्तव्य शिवाजी महाराजांना योग्य ती माहिती मिळण्यासाठी साह्यभूत ठरले होते. त्यावेळच्या गुप्त हालचालींचे पुरावे कोणालाही मिळू नयेत म्हणून महाराजांनी अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यामुळे काही पुरावे आज उपलब्ध नाहीत. मात्र इतिहासाचे योग्य आकलन करून घेतले तर तर्काने अनेक राजकीय गोष्टी सहज लक्षात येतात,’ असे आफळेबुवांनी सांगितले.

आताच्या काळात भारताविरोधात अनेक देशांनी गुंतवणूक केली आहे, विविध पातळ्यांवर तयारी केली आहे. जैविक युद्ध, सांस्कृतिक युद्ध, दहशतवादी युद्ध, धर्माच्या श्रद्धांशी युद्ध, आर्थिक युद्ध या सर्व आघाड्यांवर विजयी होण्यासाठी उपासनेची शक्ती आणि शक्तीची उपासना आपल्या मनामध्ये भरण्याची गरज आहे. देशश्रद्धा, धर्मश्रद्धा, राष्ट्रनिष्ठेसाठी योग्य ते शौर्य गाजवण्याची गरज आहे. सत्य इतिहासाचा प्रसार-प्रचार करणे, एक वेळ स्वतःला काही लाभ झाला नाही तरी चालेल, पण राष्ट्राचा कोणत्याही रीतीने ऱ्हास होणार नाही यासाठी प्रयत्नरत राहणे, धर्मनिष्ठेचा, राष्ट्रनिष्ठेचा धागा तुटू नये म्हणून कुठल्याही ज्ञातीचा, जातीचा उल्लेख उच्चनीचतेच्या भावनेतून कधीही न करणे या बाबींची आवश्यकता आहे. सर्वांचा सन्मान राखत शिवछत्रपतींचे स्वराज्य वृद्धिंगत होऊन विश्वगुरूपदावर आरूढ होऊ शकेल, अशी अपेक्षा बुवांनी कीर्तनातून व्यक्त केली. यासाठी लहान मुलांवर योग्य ते संस्कार करण्याची आणि प्रसंगी कठोर होण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही बुवांनी केले.

अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल बुवांनी आनंद व्यक्त केला. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र त्या वाढवलेल्या वास्तूचे उच्चाटन करून आणि शिवाजीराजांनी सन्मानाने जेवढा योद्ध्याचा सन्मान त्या ठिकाणी ठेवला होता, तेवढाच कायम ठेवून शिंदे-फडणवीस सरकारने मराठशाहीचा प्रचंड मोठा स्वाभिमान दाखवला आहे. कोणाचाही अवमान न करता इतिहासाचा अवमान होऊ देणार नाही, अशा प्रकारची धार महाराष्ट्रात पुन्हा एकदा आलेली दिसत आहे, असे उद्गार बुवांनी काढले.

अभंग, नाट्यपद, पोवाडे वगैरे विविध गीतप्रकारांच्या साह्याने बुवांनी शिवरायांच्या या अद्भुत पराक्रमाची कथा वीररसपूर्ण शैलीत उलगडली आणि कीर्तन उत्तरोत्तर खुलवत नेले.