कणकवली नगरपंचायतने केले कोविड काळात पतीचे निधन झालेल्या महिलांना अर्थसहाय्य

Google search engine
Google search engine

शहरातील २० महिलांचा समावेश,पहिल्या टप्प्यात १५ लाभार्थीना दिले धनादेश

कणकवली नगरपंचायत चा राज्यातील स्तुत्य उपक्रम

कणकवली | प्रतिनिधी : कोविड मुळे पतीचे निधन झालेल्या कणकवली शहरातील विधवा महिलांकरता नगरपंचायत च्या माध्यमातून प्रत्येकी 25 हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी जाहीर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांमार्फत करण्यात आली. कणकवली शहरातील नागरिक असलेल्या व कोविड काळात कोविड मुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना नगरपंचायत च्या माध्यमातून 25 हजाराचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी जाहीर केला होता. कोविडच्या महामारीमुळे पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अशा प्रकारे महिलांना मदत देणारी बहुधा कणकवली नगरपंचायती सर्वप्रथम असल्याची माहिती श्री नलावडे यांनी यावेळी दिली. जेणेकरून या अर्थसहाय्यातून महिलांनी उद्योग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी नगरपंचायतचा हा प्रयत्न असल्याचेही श्री. नलावडे यांनी सांगितले. जिल्ह्यात देखील असा निर्णय घेणारी कणकवली ही सर्वप्रथम नगरपंचायत ठरली आहे. ज्या महिलांच्या पतीचे कोविडने निधन झाले अशा महिलांचे मतदार यादी मध्ये नाव, रेशन कार्ड, आधार कार्ड देखील हे कणकवली शहरातील असण्याची गरज होती. अशा महिलांना आज कणकवली नगरपंचायत मध्ये हे अर्थसाह्य आदा करण्यात आले.

कणकवली शहरातील एकूण अशा 20 महिला असून त्यातील 15 महिलांना प्रत्येकी 25 हजाराच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित पाच महिलांचे काही कागदपत्र अपुरे असून, ते देखील लवकरच पूर्ण करून त्यांना देखील ही मदत अदा करण्यात येणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली. तसेच वेंगुर्ले येथे एका संस्थेमार्फत कोविड काळात पती गमावलेल्या महिलांना महिना 1 हजार रुपये मानधन दिले जात असल्यास ही माहिती समजली आहे. याबाबत देखील खातरजमा करून जर असे असेल तर या संस्थेमार्फत कणकवलीतील महिलांना देखील लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची श्री. नलावडे यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, किशोर राणे, महेश सावंत, लेखापाल प्रियांका सोंसुरकर, रुजुता ताम्हनेकर, आदी उपस्थित होते.