तटरक्षक दलाने आयोजित केले मैत्रीपूर्ण हॉलीबॉल सामने
रत्नागिरी : भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीद्वारे तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून दिनांक 19 व 20 जानेवारी 2024 रोजी विविध विभागांमध्ये मैत्रीपूर्ण हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन केले गेले.

भारतीय तटरक्षक दल हे 01 फेब्रुवारी 2024 रोजी आपला 48 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या दिनाच्या अनुषंगाने तटरक्षक दल विविध उपक्रम राबवित असते. याचाच एक भाग म्हणून तटरक्षक दलाच्या प्रांगणामधील हॉलीबॉल कोर्टमध्ये दिनांक 19 व 20 जानेवारी 2024 या दोन दिवसांमध्ये रत्नागिरी शहरातील विविध विभागाच्या दोन गटातील एकूण आठ संघामध्ये सामने खेळवले गेले. अ गटात रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालय, गद्रे मरीन्स एक्सपोर्ट प्रायवेट लिमिटेड, मत्स्यव्यवसाय विभाग आणि भारतीय तटरक्षक वायु अवस्थान तर ब गटात फिणोलेक्स प्रायवेट लिमिटेड, अल्ट्राटेक सीमेंट, सीमा शुल्क विभाग आणि भारतीय तटरक्षक वायु अवस्थान या कार्यालयांच्या संघाचा
समावेश होता. या सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सीमाशूल्क विभागाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग डिविजनचे प्रमुख उपायुक्त राजकुमार कोलीपाका, भा रा से, रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे आणि सीमाशूल्क विभागाचे अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर हे उपस्थित होते तर पंच म्हणून श्री ओंकार पोयरेकर, श्री विजय शिंगाडे व श्री मीनार कुरटे हे लाभले.


अतिशय अटीतटीच्या आणि रोमांचक अशा अंतिम सामन्यात सीमा शुल्क विभागाच्या संघाने पोलिस विभागाच्या संघाला तीन सेटमध्ये 18-25, 25- 18, 15-11 असा हरवत अजिंक्य पद पटकावले. तर तृतीय स्थान अल्ट्राटेक सीमेंट या संघाला मिळाले. या स्पर्धेच्या समारोपासाठी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे स्टेशन कमांडर उप महानिरीक्षक शत्रूजित सिंग म्हणाले की शारीरिक सुदृढता मजबूत करण्यात मैदानी खेळांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या स्पर्धेचा उद्देश विविध विभागांशी असलेले मैत्रीगत संबंध वृद्धिंगत करणे, रोजच्या कार्यालयीन कामाच्या बोज्यातून कर्मचार्यांना थोडा विरंगुळा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यामध्ये आपापसात एकोप्याची भावना वाढविणे हा आहे. तसेच त्यांनी वेळोवेळी असे विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करण्याबद्दल प्रयत्नशील राहू असे मत प्रकट केले.













