कार सेवकाची ३४ वर्षांची प्रतिज्ञा आज पूर्ण होणार

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर संकल्प फळाला आल्याचा आनंद

नारिंग्रेच्या राम भक्त अभ्यंकर काकांच्या त्यागाची अनोखी कहाणी!

किशोर राणे (सिंधुदुर्ग)
आम्हा शेतकरी ऊन, पावसात थांबून चालणारे नाही. कधी भणभणत्या उन्हात तर कधी काट्या-कुट्यातून भ्रमंती करणे भाग आहे. नारिंग्रेच्या सड्यावरून चालताना उन्हाचे चटके बसायचे. पायांच्या फुटलेल्या चिरांमधून वेदना व्हायच्या तेव्हा क्षणोक्षणी राम आठवायचा. असे अनेक प्रसंग आले. तेव्हा वाटले… झाले आता संपले सारे… केव्हा केव्हा वाटायचे आपण आपल्या प्रणापासून कोलमडतोय बहुधा… कितीतरी वेळ चारीबाजूने हेटाळणी झाली. कोणी सबुरीचा सल्ला दिला. अनवाणी रामभक्ती श्रेष्ठ असं काही नाही असंही सुनावले. पण माझ्या मनाने ऐकले नाही. आणि सारे श्रीरामाने निभावुन नेले. श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर होत नाही तोपर्यंत गेले ३४ वर्ष अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेणारे नारिंग्रे येथील कारसेवक दामोदर नारायण अभ्यंकर… सर्वांचे दामू काका ! त्यांची प्रतिज्ञा आता काही तासातच पूर्ण होत आहे. याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणतात ही प्रभु श्रीरामाची लिला आहे.श्रीरामाच्या आनंद सोहळ्याच्या पार्श्वभुमिवर ते दै.प्रहारशी बोलत होते.
सोमवारी अयोध्देत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी सगळेच आतुर आहेत. अनेक राम भक्तांची अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे.यातच कारसेवकांचीदेखील ईच्छा पूर्ण होत आहे. राम मंदिर होत नाही तोपर्यंत अनेक इच्छा त्याग करणारे अनेक रामभक्त आहेत.पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार करणारे नारींग्रेतील राम भक्त आहेत. मागील ३४ वर्षांपासून त्यांनी चप्पल परिधान केली नाही आहे. जोपर्यंत राम मंदिर होणार नाही तोपर्यंत चप्पल परिधान करणार नाही, असा निर्धार त्यांनी केला होता.

अन् अयोध्येतच सोडली चप्पल!
अभ्यंकर काका १९९० मध्ये कारसेवेसाठी गेले होते. भाजप, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या हिंदूत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी एकत्र येऊन भव्य कारसेवेचं आयोजन केलं होतं. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रेचं नेतृत्व केलं होतं. यात हजारो तरुण या कारसेवेत सहभागी झाले होते. या कारसेवेच्या वेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच वेळी रामासाठी आपण सिंधुदुर्गातून अयोध्येत आलो मात्र रामासाठी आपण अजून काय करु शकतो, याचा विचार करत असताना त्यांनी पादत्राणे त्याग करण्याचा निर्धार केला. त्या दिवसापासून आजपर्यंत म्हणजे गेली ३४ वर्ष त्यांनी चप्पल परिधान केली नाही.
अभ्यंकर काका ती आठवण सांगतात, १९९० साली पहिली कारसेवा अयोध्याला झाली. तेव्हा आम्ही २४ लोक देवगडातून गेलो होतो. त्या ठिकाणी माझ्या मनात आले श्रीरामाने इतका वर्ष त्याग केला आहे. रामभक्त म्हणून आपण ‘मंदिर यही बनायेंगे’… तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा श्रीरामाला सांगितले आणि तेथेच चप्पालाचा त्याग केला. सगळयांनी कौतुक केले अयोध्याहून गावी परतलो पहिले काही दिवस आनंदात गेले. पण जसे ऋतु बदलू लागले तसे कठिण वाटूले. केव्हा केव्हा वाटायचे आता या जन्मी तरी पायात चप्पल येणार नाही. पण श्रीरामाने धावा ऐकला. ३४ वर्षानंतर का होईना आमच्या समोरच संकल्प पूर्ण होतो आहे याचा आनंद आहे.

सिंधुदुर्गातून १०० च्यावर कारसेवक !
१९९२ च्या कारसेवेत सिंधुदुर्गातून १०० च्या वर तर देवगडमधून आम्ही सोळाजण २ डिसेंबरला अयोध्येत पोहोचला. ४ लाख कारसेवक तेव्हा जमा झाले होते. मुठभर वाळू नेऊन टाकायची आहे अशी सुचना ऐकू येत होती पण सारेजण आम्ही एका वेगळयाच विश्वात भारावुन गेलो होतो. ढाच्याकडे केव्हा पोहचलो हे समजले नाही पण पुढे तीस तास त्याच परिसरात होतो आणि मग कलंक धुतला गेला. ढाच्या पडला. मनी अत्यंत आनंद झाला. पण न्यायालयीन लढाई सुरू झाली. मला आजही आठवतय तेव्हा माझ्या बरोबर वाडातर चे दादा जुवाटकर, नरेंद्र भाबल, हुर्शी-पुरळ चे विकास करंदीकर, सत्यवान मणचेकर, विवेक गुरव, नारिंग्रेचे दत्ताराम घाडी, गिर्येचे विद्याधर माळगावकर यांसह पेंढरीचे सातजण होते. अनेक कारसेवक होते.

अयोध्येत जाणार…
आता संकल्प पूर्ण होतोय आहे याचा आनंद आहे. ३४ वर्ष आपण पादत्राणे त्यागली त्याबद्दल श्रीरामाला धन्यवाद द्यावेसे वाटतात. फेब्रुवारीत अयोध्येला जाणार, श्रीरामाचे डोळे भरून दर्शन घेणार आणि नंतरच संकल्प पूर्ण झाल्याचा आनंद होईल असे अभ्यंकर काका म्हणाले. श्रीराम जन्मभूमी मंदिर उभे व्हावे यासाठी १९८४ पासूनच आमचे प्रयत्न सुरू झाले होते. पहिली रथ यात्रा निघाली, ज्योत यात्रा निघाली, विट पूजनाचा कार्यक्रम झाला, राम पादुकांच्या पूजनाचा कार्यक्रम झाला पण मंदिर ‘वहि बनायेंगे’ असेच आम्ही म्हणत होतो.

कुटुंबियांचा मोठा पाठिंबा…
अभ्यंकर कुटुंब हे गावातील प्रतिष्ठित कुटुंब मानलं जातं. मागील अनेक वर्षांपासून त्याचं कुटुंब सामाजिक कार्य करतात. पायात चप्पल नसल्याने त्यांना अनेकांनी नावं ठेवले असतील मात्र त्यांनी या टीकेला कधीही उत्तर दिलं नाही. अयोध्येत चप्पल त्याग करुन आल्यावर त्यांनी हा निर्णय कुटुंबियांना सांगितला. तेव्हा कुटुंबियांनी कोणताही आक्षेप न घेता त्यांचा निर्णय मान्य केला.निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांना कायम मदत केली. पायाला झालेल्या जखमा पाहून कुटुंब अनेकदा खचून जायचे मात्र त्यांना धीर देण्यासाठी ते कायम सक्षमदेखील असायचे. कुटुंबियांनी दिलेल्या साथीमुळे मी हा निर्धार पूर्ण करु शकलो, असं ते सांगतात.

अनवाणी पायांनी केला ३४ वर्षांचा प्रवास…
अयोध्येतून परतलो ते अनवाणी पायाने… प्रवास सुरु झाला. लग्न समारंभ..धार्मीक विधी,उत्सव , ऊन, वारा पावसात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी निर्धार सोडला नाही. सड्यावरचे ऊन कोकणवासीयांना माहीत आहेच… त्याकाळात चालताना अनेकदा निर्धार सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला मात्र त्यांनी निर्धार कायम ठेवला. उन्हातान्हात अनवाणी पायाने ते आजही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. शेतात काम करताना त्यांच्या पायाला अनेकदा काटे टोचले मात्र ते मागे हटले नाहीत.

आमचे मानबींदू…
श्रीरामाचे मंदिर झाले याचा आनंद मोठा आहेच पण या देशाचे तीन मानबिंदू आहेत. शिवमंदिर, कृष्णमंदिर आणि श्रीराम मंदिर ! आता कृष्णमंदिर अतिक्रमणापासून सोडवायचे आहे. भारतातील ३० हजार मंदिरे परकिय शक्तीने आपल्या प्राबल्याखाली आणली. ती सर्वच मंदिरे मुक्त करायची झाली तर अवघड वाटते पण आमची मुळ मानबिंदू हे दिमाखातच असायला पाहिजेत. आणि हे सर्व रामराज्यात घडणार आहेच.