रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला उदंड प्रतिसाद
भूतनाथ मंदिर परिसरातील राममूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांची ‘ मांदियाळी ‘
सावंतवाडी । प्रतिनिधी : अयोध्यानगरीतील श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने मळगाव गावातील श्री रामभक्तांच्यावतीने प्रभू रामांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच
भूतनाच मंदिर आवारात असलेल्या श्रीराम मूर्तीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दर्शन, मिरवणूक, महाआरती, तीर्थ प्रसाद, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू, फुगड्या व भजनादी कार्यक्रमांसह अखंड रामनामाच्या जपामुळे सर्व मळगाव ‘राममय ‘ झाले होते.
या सोहळ्यानिमित सकाळी १० वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राम मुर्ती असलेला सजवलेला रथ, रथात राम, लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा केलेले कलाकार तसेच मिरवणूकीत सहभागी भक्तगणांनी भगव्या टोप्या, भगवे कुर्ते व भगव्या झेंड्यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जय श्री राम , प्रभु रामचंद्र की जय चा श्रीराम भक्तांनी जयघोष करीत गावातील सर्व प्रमुख मंदिरांना भेट देत संपूर्ण गावात ही मिरवणूक काढण्यात आली.
s
त्यानंतर गावातील श्री देव भूतनाथ मंदिर च्या आवारात असलेल्या प्रभू श्री रामांच्या मूर्तीचे दर्शन सुरू झाले. तत्पूर्वी सकाळी या मूर्तीची विधिवत पूजा, अभिषेक आदी कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर या मूर्तीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी २ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वितरण करण्यात आला.
यानंतर दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू, महिलांच्या फुगड्या व त्यानंतर गावातील भजन मंडळांचे भजनादी कार्यक्रम संपन्न झाले. मळगाव गावातील भक्तगणांनी उस्फूर्तपणे या सोहळ्यात सहभाग घेतल्याने संपूर्ण गावच राममय झाले होते.
Sindhudurg