भाजपच्या वतीने मालवणात भव्यदिव्य स्वरूपात शिवजयंती सोहळा….

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, बाईक रॅली, ढोल ताशांचा असणार गजर

किल्ले सिंधुदुर्ग छत्रपती शिवराजेश्वर मंदिरात महाराजांचे पूजन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार

मालवण | प्रतिनिधी : मालवण भाजपच्या वतीने रविवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. शिवजयंती सोहळ्याच्या निमित्ताने भाजप नेते प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे सकाळी १० वाजता किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिरात पूजन करणार आहेत. माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने मागील काही वर्षात सातत्याने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा शिवजयंती सोहळाही निलेश राणेंच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात भव्य दिव्य स्वरूपात साजरा होणार आहे.

१९ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत मोरयाचा धोंडा येथे पूजन होणार आहे. त्यानंतर कुंभारमाठ येथे शिवपुतळ्याचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयघोषात बाजारपेठ मार्गे बंदरजेटी अशी मोटारसायकल रॅली निघणार आहे.

बंदर जेटी येथे ढोल ताशांचा गजर होणार आहे. त्याच गजरात किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवप्रेमी व भाजप पदाधिकारी दाखल होणार आहेत. शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज्यांचे पूजन निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

भव्यदिव्य स्वरूपात साजरा होणारा या सोहळ्यात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन भाजपा पदाधिकारी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, दीपक पाटकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, निषय पालेकर यांनी केले आहे.