खेड आगाराला गतवर्षात २२.७५ कोटीचे उत्पन्न

कोरोनाच्या संकटासह संपातील भरून काढली कसर, ९३ लाखापर्यंतच्या तिकिट विक्रीची नोंद
खेड(प्रतिनिधी) खेड बसस्थानकातून तालुक्यातील ग्रामीण बसफेऱ्यांसह अन्य तालुक्यातील व लांबपल्ल्याच्या मार्गावर गतवर्षात धावलेल्या बसफेऱ्यांतून ९३ लाखापर्यंतच्या तिकिटांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. यातून आगाराला २२ कोटी ७५ लाखाहून अधिक रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
कोरोनाच्या संकटासह एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान गेली ३ वर्षे आगाराला बसलेला आर्थिक फटका गतवर्षात भरून काढण्याचा प्रयत्न आगार व्यवस्थापनाने केल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या संकटासह एसटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. संप मिटल्यानंतर कोरोनाच्या संकटातून बाहेर पडलेल्या आगार व्यवस्थापनाने झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या होत्या. आगाराने ६४ चालक, १७१ चालक
कम वाहक व ३९ वाहकांच्या सहाय्याने ६४ साध्या बसेस, ५ शिवशाही, ३ स्लीपर व ११ खासगी बसेस सुनियोजितपणे चालवल्या.
ग्रामीण व लांब पल्ल्यांवरील नियमित बसफेऱ्यांसह शिमगोत्सव, उन्हाळी सुट्टी, गणेशोत्सव, दिवाळी, शैक्षणिक सहली, विवाह  सोहळा, यात्रा, तीर्थक्षेत्र, राजकीय कार्यक्रम आदींसाठी जादा बसेस उपलब्ध करून देत प्रवाशी वाहतूक उत्पन्न वाढवण्यावर भर. दिला होता.यामुळे आगाराच्या जानेवारी ते डिसेंबर २०२३ याकालावधीत ९२ लाख ९४ हजार २२७ प्रवाशांची नोंद झाली. यातून आगाराला २२ कोटी ७५ लाख २५ हजार ९४९ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. मे महिन्यात सर्वाधिक उत्पन्न मिळाले. यामध्ये शासनाने जारी केलेल्या विविध सवलत योजनांमुळे एसटीकडे वळलेला अधिकचा प्रवासीवर्ग आगाराच्या उत्पन्नासाठी लाभदायक ठरला आहे.