भिल्लवाडी ग्रुप व मळगांव ग्रामस्थांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

सावंतवाडी । प्रतिनिधी : भिल्लवाडी ग्रुप व मळगाव ग्रामस्थ यांच्यातर्फे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक मळगाव येथे भव्य दिव्य अशा थाटामाटात साजरा करण्यात आला. या उत्सवात मळगाव गावासह पंचक्रोशीतील अनेक शिवप्रेमी सहभागी झाले होते.

शिवजयंती सोहळ्या निमित्त पहाटे ५.३० च्या सुमारास हनुमंत गड फूकेरी येथून महाराजांचा आशीर्वाद घेवून पेटती मशाल हातात घेवून शिवप्रेमींनी मशाल रॅली काढली. सकाळी ८.४० च्या सुमारास मशाल घेवून शिवप्रेमी मळगाव येथे महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याजवळ पोहोचले. त्यानंतर मशाल पूजन करण्यात आले.तसेच पुरोहितांच्या हस्ते महराजांचा दुग्धाभिषेक करण्यात आला.

दुपारी आ. नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहत शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांसह अन्य लोक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी भव्यदिव्य अशा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. ढोलताशा पथक आणि लेझिम नृत्याच्या तालात भगवे फेटे परिधान करून शालेय विद्यार्थी, युवक तसेच आबालवृद्ध शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने धूमधडाक्यात महामार्गापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रॅली काढली.

या उत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, लेझिम, नृत्य, तसेच ढोलताशा पथक, लाठीकाठी, दांडपट्टा पथक असे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. वेशभूषा, वकृत्व तसेच नृत्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला पारितोषिक देवून गौरवण्यात आले.

या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रत्येक शिवप्रेमींसाठी उत्तम अशी स्नेहभोजनाची सोय करण्यात आली होती. यावेळी सुमारे ८०० हून अधिक शिवप्रेमींनी भोजनाचा आस्वाद घेतला.

त्यानंतर रात्रौ गोमंतकातील करमळी येथील सुयोग कला मंच प्रस्तुत ‘ शिवआलिंगन ‘ या भव्य दिव्य अशा ऐतिहसिक नाटकाने कार्यक्रमाची सांगता केली गेली.

एकंदरीतच न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी वर्गणी रुपात मदत केली, ज्यांनी सहभाग दर्शवला, तसेच ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे भिल्लवाडी ग्रुप तर्फे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिल्लवाडी ग्रुपच्या पांडुरंग राऊळ, सचिन राऊळ, अंकुश राऊळ,दिपेश राऊळ, निखिल राऊळ,मयूर गावकर,उत्तम राऊळ, कृष्णा राऊळ,न्यानु राऊळ, प्रथमेश राऊळ, गजानन राऊळ, प्रमोद राऊळ, गोट्या राऊळ, पिंटू राऊळ, अरुण राऊळ, नाना राऊळ यांसह अनेक सदस्यांनी प्रयत्न केले.

Sindhudurg