वागदे आर्यादुर्गा जि. प. शाळा क्र. ५ कडे चोरट्यांचे लक्ष | दरवाजांचे कडी कोयंडे तोडून वर्ग खोल्यांत प्रवेश
कणकवली : मागील काही दिवसांपासून कणकवली शहरात घरफोड्या, फ्लॅट फोडणे, दुकाने फोडणे असे प्रकार सुरू आहेत. मात्र त्यातील चोरटे अद्यापही गजाआड झालेले नाहीत. मात्र, अलीकडेच कणकवलीत फोडा – फोडीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. शुक्रवारी कलमठ मध्ये अज्ञात चोरट्यानी ७ बंद घरे फोडण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.
शनिवारी सकाळी वागदे आर्यादुर्गा जिल्हा परिषद शाळा क्र. ५ व लगत असलेली अंगणवाडी केंद्र ८१९ या शाळांचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी शाळेतील वर्गांमध्ये प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शी दृश्य होते. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता कणकवली तालुक्यात फोडा – फोडीचे प्रकार वाढू लागले आहेत. पोलिसांसमोर देखील हे एक आव्हानच असल्याचं सर्वत्र बोललं जातंय. त्यामुळे या घर फोड्या, फोडा – फोडी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, यंत्रणा नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
वागदे आर्या दुर्गा जिल्हा परिषद शाळा क्र. ५ मधील चोरट्यांकडून कपाटे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात कोणत्याही प्रकारच्या वस्तू न सापडल्याने कोणत्याही प्रकारची नासधूस न करता तेथील इतर वर्ग खोल्यांचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरटे तिथून फरार झाले. यावेळी तेथील कोणत्या वस्तू चोरीस गेल्या याची पडताळणी केली असता मुख्याध्यापक यांनी केवळ गॅस बर्नर वरील पितळची जाळी अज्ञातांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे व पोलिस मनोज गुरव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच व ग्रामस्थ देखील घटनास्थळी दाखल झाले होते. वागदे आर्यादुर्गा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या ही ४० तर अंगणवाडी मध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या १९ एवढी आहे. त्यामुळे या शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी होत आहे. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.