ग्रामस्थांची मालवण तहसीलदारांकडे तक्रार ; तात्काळ कठोर कारवाईची मागणी
मालवण | प्रतिनिधी : कर्ली खाडीपात्रात देवली वाघवणे येथे बेसुमार अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी देवली ग्रामस्थ विरेश रावजी मांजरेकर व महेश प्रभाकर चव्हाण यांनी मालवण तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन पत्राद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, महसुल प्रशासनाकडून वाळूचे लिलाव जाहीर करुन ते मंजूर केले. त्यानुसार काही वाळूपट्टयामध्ये अधिकृत वाळू उत्खनन सुरु झाले. मात्र देवली वाघवणे येथील ज्या वाळू पट्ट्यांचे लिलाव जाहीर झालेले नाहीत अशा वाळू पट्ट्यांमध्ये (डी-५) दिवसरात्र बेसुमार वाळू उत्खनन सुरु आहे. दुपारी ३ वाजल्यापासून हे अवैध वाळू उत्खनन सुरु होते ते रात्रभर चालू असते. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.
तसेच नदी आणि लोकवस्ती यांच्यामध्ये जो खारबंधारा आहे त्याला धोका पोहोचण्याची भीती आहे. तसे झाल्यास आम्ही राहत असलेल्या घरांवर आणि बागायतींवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच दिवसरात्र चालू असणाऱ्या होड्यांच्या इंजिनांच्या आवाजामुळे सार्वजनिक शांतता भंग झालेली आहे.
तरी देवली वाघवणे येथील अनधिकृत वाळू उत्खननावर कठोर कारवाई करुन ते बंद करावे. असे पत्र विरेश रावजी मांजरेकर व महेश प्रभाकर चव्हाण यांनी तहसीलदार यांना दिले आहे.