सर्जेकोट येथील मच्छीमारांच्या मागणीनुसार माजी खासदार निलेश राणे यांचे मेरिटाईम बोर्डास पत्र
मालवण | प्रतिनिधी : सर्जेकोट बंदराच्या प्रवेश मार्गानजीक असलेल्या शिंपला पॉईंट बंधारा (बांदा) या नैसर्गिक खडकाच्या बंधाऱ्यावर मार्गदर्शक दिवे लावणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिक मच्छिमारांकडून मागणी केली जात असून त्याची दखल घेत त्वरित कार्यवाही व्हावी. असे पत्र भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी बंदर निरीक्षक महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मालवण सिंधुदुर्ग यांना दिले आहे.
यापूर्वी पाण्यात मार्गदर्शक बोया बसविण्यात आले होते. मात्र, भरती ओहोटीच्या जोरदार प्रवाहामुळे लोखंडी साखळदंड असलेला बोया तुटून वाहून गेला. मात्र, याठिकाणी पुन्हा बोया बसविणे अथवा मार्गदर्शक बत्ती बसविण्याबाबत कार्यवाही झाली नाही. याठिकाणी अपघात होऊन दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. तरी याठिकाणी अशा दुर्घटना घडू नये म्हणून त्वरित मार्गदर्शक बत्ती बसवावी अशी मागणी श्री भद्रकाली देवी मत्स्य सहकारी संस्था, मिर्याबांदा, ग्रामपंचायत मिर्याबांदा, मच्छिमारांच्या वतीने नरेंद्र जामसंडेकर यांनी प्रशासन स्तरावर वारंवार केली. तसेच माजी खासदार निलेश राणे यांचेही स्थानिकांनी लक्ष वेधले होते. याची दखल घेत निलेश राणे यांनी मेरिटाईम बोर्डास पत्र लिहून मच्छिमारांच्या मागणीची त्वरित दखल घ्यावी असे पत्र दिले आहे.