राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित | वाद्यांचा विक्रम

Google search engine
Google search engine

 

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. अब्दुल कलाम यांची साकारली कलाकृती

कणकवली: राष्ट्रीय विज्ञान दिन व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्यसाधून ज्ञानदा शिक्षण संस्था आयडियल इंग्लिशस्कूल व सोमस्थ ॲकॅडमी कणकवली तसेच सिंधुगर्जना ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल इंग्लिश स्कूलच्या परिसरात १००० पालक व विद्यार्थ्यांनी संगीतातील ढोल, ताशा, तबला, पेटी, ढोलक, मृदुंग, टाळ, हलगी, दिमडी, सिन्थेसायजर, संबळ यासह अन्य वाद्ये सलग एक तास वाजवून विक्रम केला. हा वाद्यांचा विक्रम उपस्थितांनी ‘याची देही याची डोळा’ पाहिला.

एकाच वेळी अनेक वाद्यांच्या उपक्रमाला मंगळवारी सकाळी ११:१५ मिनिटांनी सुरुवात झाली. यात ‘हम होंगे कामयाब’, ‘मेरा जुता है जपानी’, ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘बलसागर भारत होवो’ ही देशभक्तीपर गाणी विद्यार्थ्यांनी गाऊन वातावरण देशभक्तीमय केले.

पालक व विद्यार्थ्यांनी ढोल, ताशा, तबल, पेटी, ढोलकी, मृदुंग, टाळ, हगली, दिमटी, सिन्थेसायजर, लेझिम आणि अन्य वाद्ये एकाचवेळी एक तास नॉनस्टॉप वाजवून आसमंत निनादून सोडला. शेवटी विठ्ठल विठ्ठल हे गाणे गाऊन या उपक्रमाची सांगता झाली. संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकावेळी वाजवण्याचा आगळ्यावेगळ्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाल्याची घोषणा ग्लोबल रेकॉर्ड ॲड रिचर्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आली. त्यानंतर या उपक्रमात सहभागी झालेल्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी ज्ञानदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, सचिव प्रा. हरिभाऊ भिसे, बुलंद पटेल, सचिव नीलेश महिंद्रकर, सीईओ डी. पी. तानवडे, शीतल सावंत, जि. प. माजी सदस्य सावी लोके, राजेश शिर्के, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, दीपक बेलवलकर, अशोक करंबेळकर, डॉ. सुहास पावसकर, पत्रकार गणेश जेठे, महेश सावंत, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, डॉ. आपटे, अनंत बढ़े, संदीप पेंडुरकर, योगेश गोडवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमात खारेपाटण विद्यालय, जि. प. शाळा नंबर १, जि. प. शाळा नंबर २ जि. प. शाळा कलमठ डिगस हायस्कूल, आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन व आभार प – दर्शन राजेश कदम यांनी केले. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.