कणकवली : मराठी साहित्य हे सर्वश्रेष्ठ असे आहे. मराठी मायबोली असलेल्या भाषेला फार मोठा इतिहास आहे. मराठी भाषा बोलताना मनात कोणताही न्यूनगंड ठेवता कामा नये. मराठीतील साहित्य हे दर्जेदार असल्याने वाचन संस्कृती जोपासा व मराठी वाचक वाढवा असे प्रतिपादन प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे चेअरमन यांनी केले.
कणकवली कॉलेज कणकवली येथे मराठी विभागातर्फे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजश्री साळुंखे उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, दर कोसावर भाषा बदलते; तरीसुद्धा मराठी भाषा आपले सौंदर्य जपणारी भाषा आहे. आपण इतर भाषेचा आदर केला पाहिजे परंतु आपल्या माय मराठीचा ही गौरव आपणच करायला हवा”. प्रारंभी दीपप्रज्वलन व कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचावर प्रभारी प्रा.युवराज महालिंगे प्रा. अरुण चव्हाण प्रा. सीमा हडकर प्रा.विनिता ढोके प्रा. विजयकुमार सावंत उपस्थित होते.
प्राचार्य युवराज महालिंगे यांनी मराठी भाषेचे महत्व व मराठीतील दर्जेदार साहित्याचा आढावा घेऊन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाविद्यालयीन पातळीवर वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजेत असे मत व्यक्त केले. प्रा. सीमा हडकर यांनी आजच्या डिजिटल युगातही मराठी भाषा आपली अस्तित्व टिकवून असल्याचे सांगितले. नव नवीन प्रसार माध्यमांच्या वापर आपण लिहिते आणि बोलते होण्यासाठी केले पाहिजे. मराठी भाषा ही आपल्यात सर्व भाषांना सामावून घेत नवीन शब्दांची भरणा करून भाषा अधिकाधिक समृद्ध समृद्ध होत आहे. जोपर्यंत मराठी माणूस आहे तोपर्यंत मराठी भाषा ही जिवंत राहणार असल्याचे मत व्यक्त केले.
प्रा. अरुण चव्हाण यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. साक्षी हरणे, संयुक्ता गावकर चंदन नावगेकर, साक्षी गावकर, दिव्या मगर, जान्हवी सुतार, मनस्वी खरात इत्यादी विद्यार्थिनीनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. या निमित्ताने मराठी विभागातर्फे ‘काव्यरंग’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात संत, पंत, तंत कवितेपासून ते साठोत्तरी कवितेपर्यंतच्या कवींच्या कवितांचे अभिवाचन करून गीत गायनाचा कार्यक्रम करण्यात आला. यात सार्थक ठकरूल,मृणाल गावकर, सूचिता आरेकर, ऐश्वर्या घाडीगांवक गीत गायन व प्रा. सीमा हडकर, बुद्देश सावंत, अक्षता पाडलोसकर यांनी कविता वाचन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनिता ढोके यांनी, सूत्रसंचालन कु. मृणाल गावकर तर आभार प्रा. विजयकुमार सावंत यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.