अनधिकृत वाळू साठ्याला लाखोंची बोली

आंबेरी, देवली येथील हजारो ब्रास वाळू साठ्याचे लिलाव पूर्ण : तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने महिनाभरापूर्वी केलेल्या कारवाईत आंबेरी येथे 1,144 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला. तसेच देवली मार्गावर 332 ब्रास अनधिकृत वाळू साठा जप्त केला होता. या दोन्ही वाळू साठ्याची लिलाव प्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. दोन्ही वाळू साठ्याच्या सर्वोच्च बोली लिलावातून सुमारे दहा लाख रक्कम महसूल तिजोरीत जमा होणार आहे. अशी माहिती मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

 

आंबेरी येथील 1,144 ब्रास वाळू साठ्याची लिलावं प्रक्रिया आंबेरी तलाठी कार्यालय येथे किमान 600 रुपये प्रतिब्रास बोली रकमेवर करण्यात आली. याला राजन सारंग यांच्या 650 प्रतिब्रास सर्वोच्च बोली रकमेस वाळू साठ्याचा लिलाव देण्यात आला. तर देवली येथील 332 ब्रास वाळू साठ्याची लिलाव प्रक्रिया देवली तलाठी कार्यालय येथे 650 प्रतिब्रास किमान बोलीवर सुरु झाली. यात सिद्धांत सडवेलकर यांच्या 655 प्रतिब्रास या सर्वोच्च बोलीला वाळू साठा देण्यात आला. दोन्ही लिलावातून 9 लाख 61 हजार 60 रुपये रक्कम तसेच या रकमेवर अन्य शासकीय कर लागू करून अंतिम रक्कम भरणा करून घेतली जाणार आहे. असे तहसीलदार यांनी सांगितले.