पळसंब द्विगीवाडी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

आचरा | अर्जुन बापर्डेकर : पळसंब द्विगीवाडी गावात चिरेखाण व्यावसायिकांची सुरु असलेली चौदा आणि सोळा चाकी वाहतुकीमुळे या भागातील रस्त्याची पुर्णतः दुर्दशा झाली आहे. याबाबत आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार मालवण यांना दिला आहे. याबाबत जानेवारी महिन्यामध्ये महसूल प्रशासनाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. महसूलला दिलेल्या निवेदना नुसार सोईसुविधांपासून दुर्लक्षित अशा द्विगीवाडी भागात राहणारे ग्रामस्थ असून जयंती देवी मंदिर ते द्विगीवाडी जाण्यासाठी एकमेव असलेल्या रस्त्यावर सध्या चिरेखाण व्यावसायिकांच्या चौदा ते सोळा चाकी वाहतुक सुरु आहे. याभागात चार चिरेखाणी असून त्या दिवसरात्र सुरु असतात.चौदा आणि सोळा चाकी वाहनातून होणारया वाहतुकीमुळे याभागात जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची पुर्णतः चाळण झाली आहे.संपूर्ण रस्त्यावर भरमसाठ धुळीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे रोज दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार सुरु आहेत.यारस्त्यावरील अवघड वाहतूक तात्काळ थांबवून रस्ता दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे.तरी तातडीने वाहतूक बंद न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा द्विगीवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.