रत्नागिरी | प्रतिनिधी : येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांना कासव संवर्धन उपक्रमाचे चित्रफीत दाखविण्यात आली. कासवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ऑलिव्ह रिडले जातीची मादी कासव समुद्रकिनारी येऊन १ ते दीड फूट खड्डा खणून त्यात आपली अंडी घालते. स्वतः च त्यावरती दाब देऊन वाळू पसरवते आणि समुद्रात निघून जाते. परंतु ही अंडी माणसांकडून, वन्य प्राण्यांकडून उकरून काढून घेतली जातात. परिणामी नवीन कासवांची उत्पत्ती कमी होत गेली म्हणून या कासवाच्या अंड्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे झाले आणि त्यासाठी विविध प्रकल्प राबवले जात आहेत आणि त्यांची माहिती चित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान शाखाप्रमुख प्रा. विनय कलमकर यांनी केले. प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी विज्ञान दिनाची भूमिका स्पष्ट करताना भविष्यात महाविद्यालयातूनही विद्यार्थी संशोधनाकडे वळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
बागेश्वरी रेड्डी,अनामिका गुरव या विद्यार्थिनींनी विज्ञान दिनाचे महत्त्व आणि पार्श्वभूमी यावर मनोगते व्यक्त केली. उपप्राचार्या वसुंधरा जाधव, प्राध्यापक, विज्ञान शाखेचे व भूगोल विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिथिला वाडेकर यांनी केले तर सौ. मानसी हर्डीकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना विज्ञान आणि व्यावसायिक मानसिकता यातील दरी सांधली जाईल असे प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. कार्यक्रमासाठी प्रा. आसावरी मयेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.