पाटपन्हाळे | वार्ताहर : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक -पालक मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. २५ फेब्रुवारीला करण्यात आले होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व त्यावरील उपाय योजनेसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये महाविद्यालयातील कला विभागातील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या मेळाव्यात महाविद्यालयातील कला विभागातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सहविचार सत्रात आपल्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. प्रसाद भागवत यांनी विद्यार्थ्यांना भेडसावणारया आर्थिक समस्या व महाविद्यालयाकडून विद्यार्थी समाज कल्याण विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजनेविषयी माहिती दिली. तर महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितिती बाबत तसेच अभ्यासाबाबत आणि विद्यापीठाने दिलेल्या निर्देशाविषयी पालक- विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. दिनेश पारखे यांनी जाणीव करून दिली. या मेळाव्यात उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांचा आढावा थोडक्यात घेतला. तर पालक श्री. पांडुरंग पावसकर यांनी पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच अंगीभूत कलागुणांना संधी देवून विशेष प्रयत्न करावे असे आवाहन केले. तर सौ. खुर्देकर यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या पालक व शिक्षक यांच्यासमोर मांडून सोडविण्याचा प्रयत्न करावा असे मत मांडले
प्राचार्य प्रा. प्रमोद देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षात येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती आणि त्यासाठी विद्यार्थी व पालक यांची भूमिका याविषयी विशेष मार्गदर्शन केले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कला शाखा समन्वयक प्रा. डॉ. दिनेश पारखे विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रवीण सनये यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जालिंदर जाधव यांनी केले.