तोंडवळी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी उपोषण

Google search engine
Google search engine

आचरा | अर्जुन बापर्डेकर : तोंडवळी येथील वन विभागाच्या जागेतील ६०० मीटर रस्त्यासह एकूण साडे पाच किमीच्या रस्त्यासाठी सुमारे दोन कोटी पेक्षा निधीची आवश्यकता आहे. मात्र या रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. रस्त्याबाबत निधी उपलब्धता व प्रशासकीय मान्यतेबाबत जोपर्यंत प्रशासकीय पातळीवर लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे तोंडवळी ग्रामस्थांनी एकमुखाने सांगितले.

तोंडवळी येथील रस्ताप्रश्नी सरपंच नेहा तोंडवळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तोंडवळी सुरू बन याठिकाणी बुधवारी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपसरपंच हर्षद पाटील, ग्रामपंचायत सदस्या सुजाता पाटील, स्नेहल पाटील, मानसी चव्हाण, अनन्या पाटील, माजी सरपंच आबा कांदळकर, जयहरी कोचरेकर, गणेश तोंडवळकर, संजय केळुसकर, दीपक कांदळकर, वासुदेव पाटील, आशिष पाटील, ताता टिकम, ऍड ओंकार केणी यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

तोंडवळी सुरू बन येथून जाणाऱ्या रस्त्यासाठी पर्यावरण, वन विभागाची परवानगी आवश्यक आहे, ती परवानगी मिळणे बाकी आहे. तत्पूर्वी संपूर्ण रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन प्रशासकीय मान्यता मिळणे ही सर्वात महत्वाची बाब आहे. निधी मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा एक सूर उपोषणकर्त्यानी व्यक्त केला.

वन व बांधकाम विभाग उपोषणस्थळी
उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कमलिनी प्रभू, शाखा अभियंता प्रमोद कांबळे, शाखा अभियंता आर. एस. पवार, वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक सावंतवाडीचे अमृत शिंदे, वनअधिकारी श्रीकृष्ण परीट, अनिल परब यांनी भेट दिली. वन विभागाने आपल्याकडून आवश्यक असणारे सहकार्य केले जाईल. मात्र केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी महत्वाची असल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून २५ लाखाच्या निधीचे पत्र प्राप्त आहे. तर बजेट अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे सांगितले.

पोलिसांकडून नोटीस
उपोषणकर्त्या ग्रामस्थांना मालवण पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने मनाई आदेशाचा भंग झाल्यास किंवा दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्याचे कृत्य घडल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस पोलिसांनी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी दिली. तरीही ग्रामस्थांनी शांततेच्या मार्गाने नियोजित उपोषण सुरू ठेवले आहे. पोलीस निरीक्षक विजय यादव व पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थितीबाबत माहिती घेतली.

न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार!
तोंडवळी सुरू बन व परिसरातील रस्त्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत अपूर्ण व नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे रस्त्यासाठी निर्णायक लढा ग्रामस्थ लढत असून जोपर्यंत निधीच्या प्रशासकीय लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.