५१४ श्री सदस्यांनी उचलला ११ टन कचरा
राजापूर | वार्ताहर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांचे मार्फत पद्मश्री व महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदशनाखाली महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त बुधवारी श्री सदस्यांमार्फत राजापूर नगर परिषद हद्दीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संपूर्ण भारतात त्याचप्रमाणे परदेशातही महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगाचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील श्री सदस्यांनी राजापूर नगरपरिषद हद्दीतील सर्व रस्त्यावरील व त्याचप्रमाणे प्रमुख ठिकाणावरील कचरा उचलल्याचे मौलिक कार्य केले.
या महास्वच्छता अभियानासाठी श्री सदस्य सकाळी ७ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत स्वच्छतेच्या कार्यात मग्न होते. कार्यक्रमासाठी राजापूर तालुक्यातून ५१४ श्री सदस्य उपस्थित होते. या श्री सदस्यांच्या माध्यमातून ०९ टन सुका कचरा व २ टन ओला कचरा उचलण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
यावेळी नगरपरिषद मुख्यधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपरिषदेतील अन्य सदस्य तसेच व कोदवली गावचे सरपंच, ग्रामसेवक व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.