प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात गायन स्पर्धा

गुहागर | प्रतिनिधी : परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात दि.१ मार्च २०२३ रोजी प्रेमजीभाई आसर शाळेच्या शिक्षिका प्राची प्रदीप गगनग्रास यांच्या मातोश्री कै. सुनिता सुधाकर कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इ. ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी संस्थांतर्गत गायन स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व कलाश्री सुगम संगीत महाविद्यालय- रावतळेचे संगीत विशारद श्री.वरद सुमंत केळकर हे परीक्षक म्हणून लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता नाईक यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
विघ्नहर्त्या गणेशाला तू सुखकर्ता तू दुःखहर्ता या गाण्याने कु.इशिका आग्रे हिने वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी अभंग,बालगीते,भावगीते,भक्तिगीते अशी विविध गीते आपल्या सुमधुर आवाजात सादर केली. कोणतेही वाद्य नसतानाही विद्यार्थ्यांनी आपली कला साध्य केली हे स्पर्धेचे खास वैशिष्ट्य होते.
मुख्याध्यापिका यांनी मनोगतातून शाळेचे माजी विद्यार्थी आजी विद्यार्थ्यांसमोर परीक्षक म्हणून आले हा योग शाळेला निश्चितच अभिमानास्पद आहे अशी भावना व्यक्त केली. याचबरोबर निखळ आनंद देण्याचं सामर्थ्य गायन कलेत आहे. हा आनंद आज या गायनस्पर्धेच्या माध्यमातून सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी सर्वांना दिला. ही कला अशीच विद्यार्थ्यांनी जोपासावी असे आवाहन त्यांनी केले .
यानंतर परीक्षक श्री.वरद केळकर यांनी मुलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, या वयात शाळा तुम्हांला संगीत क्षेत्रात पुढे नेत आहे हे खूपच अभिमानास्पद आहे. आज मी जो तुमच्यासमोर परीक्षक म्हणून उभा आहे ते या शाळेमुळेच.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुश्री गौरव भागवत, द्वितीय क्रमांक सुवेद प्रदीप बागवे तर तृतीय क्रमांक सार्थक जंगम या विद्यार्थ्याला मिळाला.
मुख्याध्यापिकांच्या हस्ते परीक्षक श्री.वरद केळकर यांना भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्योती शिंदे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्राची गगनग्रास यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शर्मिला मोडक यांनी केले.