धरणामुळे कृषी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार शिवसेना नेते रामदास कदम यांचे प्रतिपादन;
खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील आंबवली येथे ४३ कोटी ९८ लाख ५३ हजार १४८ रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या लघुपाटबंधारेच्या धरण प्रकल्पामुळे ८ ते १० गावातील कृषी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निघेल. या प्रकल्पाद्वारे २०० हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन ओलिताखाली येणार असून खऱ्या अर्थानि पंचक्रोशी सुजलाम्-सुफलाम् बनेल, असा विश्वास शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केला.
आंबवली येथे कोट्यवधी रूपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, आंबवली विभागातील ग्रामस्थांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईला समोर जावे लागते. यासाठी ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्याकडे व्यथा मांडल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला.
अखेर या प्रकल्पासाठी ४३ कोटी ९८ लाख ५३ हजार १४८ रूपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. या धरण क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना शासनाकडून मोबदला मिळवून देण्यासाठी आमदार योगेश कदम कटिबद्ध राहतील, अशी ग्वाहीही दिली. ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तरूणांनी व्यावसायिक शेती व शेती पूरक व्यवसाय करावे असे मत देखील व्यक्त केले.
या लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे आंबवली परिसरातील वरवली, देवघर, हुंबरी या गावातील कृषी सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येईल, असा विश्वासही शेवटी व्यक्त केला.
आंबवली येथे उभ्या राहत असलेल्या छोट्या जलसिंचन प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बारमाही शेती व भाजीपाला व शेती व्यवसाय व भाजीपाला घेणे आता शक्य होणार असून
याद्वारे भागाचा आर्थिक विकास होईल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला. येत्या २ वर्षातच धरण पूर्ण करण्याच्या सूचनाही ठेकेदार कंपनीला दिल्या.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन धाडवे, माजी सभापती सुप्रिया पवार, तालुका संघटक महेंद्र भोसले, रामचंद्र आईनकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांसह शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.










