चिपळूणच्या वाळू चोराची राणे कुटुंबावर बोलण्याची नाही पात्रता

आ. भास्कर जाधवांचा संजू परब यांनी घेतला समाचार

यापुढे असे धाडस केल्यास जशास तसे उत्तर

सावंतवाडी । प्रतिनिधी : मंदिरात शिव्या दिल्याने ज्याला स्वतःच्या गावात स्थानिक ग्रामस्थांनी झोडपून काढले त्या चिपळूणच्या वाळू चोराची राणे कुटुंबावर बोलण्याची पात्रता नाही. त्यामुळे यापुढे असे धाडस केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी आ. भास्कर जाधव यांना दिला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

स्वतः सेना राष्ट्रवादी व पुन्हा सेना अशा बेडूक उड्या मारणाऱ्या वाळू चोराने निष्ठेच्या गप्पा मारू नयेत. सेनेतून राष्ट्रवादीत गेल्यावर उद्धव ठाकरेंवर ‘ हा फोटोग्राफर आहे मात्र याच्याकडे स्टुडिओ नाही ‘ अशी टीका याच वाळू चोराने केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील याने टीका केली होती. तर त्यानंतर पुन्हा सेनेत गेल्यावर शरद पवार यांना देखील टीकेचे लक्ष केले होते. अशा कोणाशीही प्रामाणिक नसलेल्या वाळू चोराला जनताच धडा शिकवील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हा वाळू चोर जिल्हा परिषद सदस्य असताना त्याला १५ लाख रुपयांची गरज होती. त्यावेळी आमचे नेते नारायण राणे यांनी त्याला ही मदत त्वरित केली होती. मात्र, उपकाराची कोणतीही जाण नसलेल्या या वाळू चोराने त्यांच्यावरच ज्या पद्धतीने टीका केली ती अत्यंत निषेधार्ह असून यापुढे जिल्ह्यात येऊन त्याने असा प्रयत्न केल्यास त्याचे वेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाईल असा इशाराही यावेळी संजू परब यांनी दिला.

राजकारणात टीका टिपणी होत असते. मात्र या वाळू चोराचा ज्या पद्धतीने टीकेचा दर्जा घसरला आहे त्यावरून त्याची संस्कृती दिसून येते. आमचे नेते स्वतःहून कोणावरही टीका करीत नाहीत मात्र अंगावर आला तर शिंगावर घेतल्या वाचून सोडत नाहीत. त्यामुळे आमच्या नेत्यावर अशा प्रकारे कोणी यापुढे टीका केली तर त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, अमित परब, बंटी पुरोहित, विनोद सावंत आदी उपस्थित होते.

 

फोटो – पत्रकार परिषदेत बोलताना भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब सोबत अजय गोंदावळे, आनंद नेवगी व अन्य

Sindhudurg